
कोलंबो : श्रीलंकेने २०१९ च्या विश्वचषक स्पर्धेसाठी धक्कादायक निर्णय घेत एकदिवसीय संघाचा नियमित सदस्य नसलेल्या खेळाडूला श्रीलंकेने कर्णधार बनवले आहे. जशी एकदिवसीय क्रिकेटमधील भारतामध्ये चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची प्रतिमा आहे, तशीच श्रीलंकेच्या या खेळाडूची आहे. श्रीलंकेने विश्वचषक स्पर्धेसाठी दिमुथ करुणारत्नेला कर्णधार बनवले आहे. टेस्ट स्पेशलिस्ट म्हणून ओळख असणाऱ्या ३० वर्षांच्या दिमुथ करुणारत्नेने ९ वर्षांमध्ये ६० टेस्ट मॅच खेळल्या आहेत. तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्याला फक्त १७ मॅच खेळण्याची संधी मिळाली आहे. आत्तापर्यंत एकही टी-२० सामना दिमुथ करुणारत्नेने खेळलेला नाही.
विश्वचषक : तळीराम क्रिकेटपटु श्रीलंकेच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार
बुधवारी १७ एप्रिलला श्रीलंका क्रिकेट बोर्डाने एकदिवसीय संघाचा कर्णधार म्हणून दिमुथ करुणारत्नेची घोषणा केली असली, तरी अद्याप संघाची निवड झालेली नाही. या विश्वचषक स्पर्धेला ३० मेपासून इंग्लंडमध्ये सुरुवात होईल. २०१५ विश्वचषक स्पर्धेनंतर ३० वर्षांचा दिमुथ करुणारत्नेने श्रीलंकेकडून एकही एकदिवसीय सामना खेळलेला नसल्यामुळे करुणारत्नेला कर्णधार बनवण्याचा निर्णय हैराण करणारा आहे. करुणारत्नेने श्रीलंकेकडून १७ एकदिवसीय मॅचमध्ये १५.८३ च्या सरासरीने १९० रन केले आहेत. करुणारत्नेचा सर्वाधिक स्कोअर ६० रन आहे. करुणारत्नेच्या नावावर एकच अर्धशतक आहे.
श्रीलंकेच्या कसोटी संघाचा दिमुथ करुणारत्ने हा कर्णधार आहे. श्रीलंकेने त्याच्याच नेतृत्वात दक्षिण आफ्रिकेत पहिल्यांदाच ऐतिहासिक कसोटी मालिका जिंकली होती. श्रीलंकेने मागच्या चार मालिकांमध्ये वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वात खेळल्या. अनुभवी जलदगती गोलंदाज लसिथ मलिंगा दिमुथ करुणारत्नेला कर्णधार बनवल्यामुळे या रेसमधून बाहेर झाला आहे. मलिंगाकडे या विश्वचषक स्पर्धेमध्ये श्रीलंकेचे कर्णधारपद राहिल, अशी शक्यता वर्तवली जात होती. पण श्रीलंका क्रिकेट बोर्डाने आश्चर्याचा धक्का दिला आहे. मागच्या महिन्यात करुणारत्नेला एका अपघातानंतर नशेमध्ये गाडी चालवल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. याबद्दल करुणारत्नेला दंडही ठोठवण्यात आला होता.
