वाराणसी : लोकसभा निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरु असून या निवडणुकीतून भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी माघार घेतली आहे. निवडणुकीच्या रिंगणात भीम आर्मी उतरल्यामुळे वाराणसीतील दलित मतांची विभागणी होणार असल्यामुळे निवडणुकीतून मी माघार घेत असल्याचे चंद्रशेखर आजाद यांनी जाहीर केले आहे.
लोकसभा निवडणुकीतून चंद्रशेखर आजाद यांची माघार
वाराणसी येथे 19 मे रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडणार आहे. भाजपकडून या मतदारसंघातून नरेंद्र मोदी निवडणूक लढवणार आहेत. भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आजाद यांनीही त्यांना टक्कर देण्यासाठी वाराणसीतून निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली होती. उत्तर प्रदेशातील राजकीय वातावरण त्यांच्या या घोषणेनंतर ढवळून निघाले होते. पण त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा केली आहे.
वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा भीम आर्मीने करताच अनेक ठिकाणी जल्लोष करण्यात आला होता. पण काही विरोधीपक्ष याचा फायदा घेत असल्याचे माझ्या लक्षात आले. तसेच निवडणुकीच्या रिंगणात भीम आर्मी उतरल्याने वाराणसीतील दलित मतांची विभागणी होत असल्यामुळे लोकसभा निवडणुकीतून मी माघार घेत असल्याचे जाहीर करत असल्याचे भीम आर्मीचे संस्थापक चंद्रशेखर आजाद यांनी सांगितले. तसेच निवडणुकीत भीम आर्मीने काँग्रेसला जाहीर पाठिंबा दिला आहे. पण आघाडीला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला नसल्याचे जाहीर केले आहे.
तसेच दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना भेटण्यास येत्या काही दिवसात चंद्रशेखर आजाद दिल्लीत जाण्याची शक्यता असल्यामुळे भीम आर्मीकडून दिल्लीत आम आदमी पार्टीला (आप) पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.