ब्रेकअपची बोंबाबोंब चक्क होर्डिंग लावून

hording
एखादी रिलेशन शिप जशी कोणी मुद्दाम ठरवून सुरु होत नाही, त्याचप्रमाणे ही रिलेशनशिप कायम टिकून राहील याची शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. एखाद्या व्यक्तीशी असणारी रिलेशनशिप संपुष्टात येण्यामागे अनेक कारणे असू शकतात. वैचारिक मतभेद, रिलेशनशिपमध्ये असताना स्वतःची खासगी स्पेस न मिळणे, सरत्या काळासोबत आपल्या प्राथमिकता बदलणे इथपासून, सध्याच्या ‘मिलेनियल्स’च्या युगामध्ये जोडीदाराच्या विचित्र सवयी, शॉपिंग किंवा सिनेमाला न घेऊन जाणे इथपर्यंत कोणतेही कारण ब्रेकअपसाठी निमित्त होऊ शकते. रिलेशनशिप संपविण्याचा निर्णय झाल्यानंतर त्यावर विचार करण्यात अजिबात वेळ न दवडता, तशी कल्पना आपल्या जोडीदाराला काही जण प्रत्यक्ष भेटून देतात, तर काही जण फोनवर बोलून, किंवा मेसेजच्या माध्यमातून आपले विचार आपल्या जोडीदारापर्यंत पोहोचवितात. मात्र इंडोनेशियातील एका तरुणाने आपण रिलेशनशिप संपवीत आहोत हे आपल्या मैत्रिणीला सांगण्यासाठी एक अजब उपाय अवलंबला.


इंडोनेशियातील सेमारांग या ठिकाणी एका तरुणानेही आपल्या मैत्रिणीशी असलेली रिलेशनशिप संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयामागे कारणही तसेच होते. त्याच्या नकळत त्याच्या मैत्रिणीचे दुसऱ्याच तरुणाबरोबर संबंध सुरु होते. हे समजल्यावर प्रेमभंग झालेल्या संबंधित तरुणाला धक्का बसलाच, पण त्याचबरोबर त्याला आपल्या मैत्रिणीच्या वागण्याचा साहजिकच राग ही आला. या रिलेशनशिपमध्ये काही अर्थ राहिला नाही असे ठरवून त्याने ही रिलेशनशिप संपविण्याचा निश्चयही केला.

मात्र आपल्या मैत्रिणीला ही गोष्ट सांगण्यासाठी मनाने दुखाविलेल्या या प्रेमवीराने तिची प्रत्यक्षात भेट न घेता, किंवा तिच्याशी फोनवर संभाषणाच्या किंवा मेसजच्या द्वारे संपर्क न साधता, शहरातील भरगर्दीच्या चौकामध्ये चक्क आपल्या मैत्रिणीचे छायाचित्र असलेली मोठमोठी होर्डींग्ज लावली. एवढ्यावरच न थांबता या पठ्ठ्याने, आपण आपल्या मैत्रिणीशी ब्रेकअप करीत असल्याचे आणि तसे करण्यामागचे कारण चक्क लाउडस्पीकर वरून जगजाहीर केले ! या सर्व घटनेचा व्हिडियो सोशल मिडीयावर व्हायरल झाला असून, उत्साही नेटकरी मंडळींनी अनेक प्रतिक्रिया यावर व्यक्त केल्या आहेत. काहींच्या मते या प्रेमवीराने केलेले हे कृत्य योग्य आहे तर काहींनी या कृत्याचा निषेध करीत अशा प्रकारे जाहीरपणे आपल्या व्यक्तिगत आयुष्याचे प्रदर्शन करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment