घरामधील दुर्मिळ पितळेच्या वस्तू अशा ठेवा चकाचक

brass
पूर्वीच्या काळी घरामध्ये पितळ्याच्या वस्तू घरामध्ये असणे सामान्य होते. मोठमोठे हंडे, घागरी, किंवा मोठमोठ्या मूर्ती, समया, कडीचे डबे यांसारख्या वस्तू प्रत्येक घरामध्ये असत, आणि इतकेच नव्हे तर या सर्व वस्तू नेहमीच्या वापरातील असत. काळ बदलला तशी पितळ्याची जागा अल्युमिनियम आणि स्टीलने घेतली. आताच्या काळामध्ये प्लास्टिक आणि काचेच्या वस्तूंनी टिकाऊ स्टीललाही मागे टाकले आहे. त्यामुळे आताच्या काळामध्ये पितळ्याच्या वस्तू पहावयास मिळतात त्या अगदी अभावाने, आणि त्यादेखील शोभेच्या वस्तू म्हणूनच. जुन्या, आताच्या काळामध्ये ‘अँटिक’ म्हटल्या जाणऱ्या पितळ्याच्या वस्तूंचे सौंदर्य त्यांच्या सुदर घडणीत असतेच पण त्याचबरोबर या वस्तूंची चमकही या वस्तूंना आकर्षक बनविते. पितळ्याच्या वस्तू घासून चकचकीत ठेवणे हे पूर्वीच्या काळी मोठे मेहनतीचे काम असले, तरी आजकाल बाजारामध्ये सहज उपलब्ध असणाऱ्या अनेक प्रोडक्ट्सच्या मदतीने हे काम सहज साध्य होणारे आहे. या प्रोडक्ट्सच्या शिवायही अनेक घरगुती वस्तूंचा वापर करूनही आपण आपल्या घरातील अँटीक वस्तू चमकत्या ठेऊ शकतो.
brass1
एका मुलायम मलमलच्या कपड्यावर थोडीशी टूथपेस्ट घेऊन ही पेस्ट पितळ्याच्या वस्तूवर व्यवस्थित पसरावी. त्यानंतर काही सेकंद ही पेस्ट पितळ्यावर राहू देऊन त्यानंतर मुलायम, कोरड्या कपड्याच्या सहाय्याने वस्तू घासून काढत पेस्ट पुसून काढावी. टूथपेस्ट प्रमाणेच पितळ्याची वस्तू साफ करण्यासाठी टोमॅटो केचपचा ही वापर करता येईल. वस्तूला केचप लावल्याने पितळ्यावर असलेले काळसर डाग निघून जाण्यास मदत होते. यासाठी एका मुलायम कपड्यावर केचप घेऊन त्याने वस्तू घासावी आणि त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घेऊन कपड्याने कोरडी करून घ्यावी.
brass2
पितळ्याची वस्तू स्वच्छ करण्याकरिता व्हिनेगर आणि मैद्याच्या पेस्टचा वापर करता येतो. ही पेस्ट तयार करण्यासाठी दोन मोठे चमचे प्रत्येकी व्हिनेगर, मैदा, आणि पाणी एकत्र करावे. हे पेस्ट पितळ्याच्या वस्तूवर व्यवस्थित पसरावी आणि काही मिनिटे वाळू द्यावी. त्यानंतर कोरड्या, मऊ कपड्याने ही पेस्ट पुसून काढावी. त्यानंतर वस्तू साबणाने धुवून घेऊन लगेच कोरड्या कपड्याने पुसून काढावी. पितळ्याची वस्तू स्वच्छ करण्यासाठी लिंबू आणि मिठाचा वापर करता येतो. यासाठी लिंबू अर्धे कापून घेऊन त्यावर मीठ घालावे. त्यानंतर मीठ लावलेल्या लिंबाने पितळ्याची वस्तू रगडावी. वस्तू रगडत असताना लिंबू हलक्या हाताने पिळावे, जेणेकरून मिठाच्या सोबत लिंबाचा रस ही वस्तूवर पसरेल. संपूर्ण वस्तूवर मीठ आणि लिंबाचा रस पसरल्यानंतर कोरड्या, मुलायम कपड्याने वस्तू स्वच्छ पुसून काढावी. यामुळे पितळ्यावरील डाग नाहीसे होतातच, शिवाय जर वस्तू तेलकट झाली असली, तर तेलकटपणाही निघून जातो.

Leave a Comment