पुण्याचे बॉलीवूडशी असे आहे खास कनेक्शन

pune
अभिनेत्यांनी साकारलेल्या भूमिका, आणि उत्तम कथानक यांच्याशिवाय श्रवणीय संगीत आणि त्याचबरोबर विविध प्रेक्षणीय ठिकाणी केले गेलेले चित्रपटाचे चित्रीकरण या बॉलीवूडच्या खासियती आहेत. चित्रपटांमध्ये दर्शविली गेलेली प्रेक्षणीय स्थळे पाहून प्रेक्षकही या ठिकाणी मनानेच भ्रमंती करून येत असतात. पण त्याचबरोबर अनेक चित्रपटांच्या कथानकाची तशी गरज असल्याने चित्रपटाचे चित्रीकरण शहरांमधील किंवा खेडेगावांमधील काही ठिकाणी करण्यात येते. उदाहरणच द्याचे झाले, तर सई परांजपे दिग्दर्शित ‘कथा’ हा चित्रपट पुण्याच्या एका वाड्यामध्ये चित्रित केला गेला होता. वाड्यामध्ये राहणारी मंडळी आणि त्यांची एकमेकांशी निगडीत दैनंदिन आयुष्ये यांच्या पार्श्वभूमीवर या चित्रपटाचे कथानक आधारलेले आहे. तसे बॉलीवूडचे पुण्यावरील प्रेम फार पूर्वीपासूनचे आहे. अगदी अलीकडच्या काळामध्ये देखील अनेक हिट झालेल्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण पुणे शहरात झाले आहे.
pune1
राणी मुखर्जी अभिनीत ‘अैय्या’ या चित्रपटामध्ये राणीने एका मराठी मुलीची भूमिका साकारली असून, या चित्रपटाचे चित्रीकरण संभाजी पुलाच्या आसपासच्या परिसरामध्ये, रास्ता पेठ आणि गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स मध्ये झालेले आहे. फुले मंडईची काही दृश्ये देखील या चित्रपटामध्ये आहेत. आयुष्मान खुराना आणि तबू अभिनीत ‘अंधाधून’ या चित्रपटाचे बहुतेक सर्व चित्रीकरण पुण्यामध्ये झाले असून, पुण्यातील एमजी रोड, फर्ग्युसन कॉलेज रोड, प्रभात रोड, मगरपट्टा, शिशा जॅझ कॅफे इत्यादी ठिकाणी या चित्रपटाचे चित्रीकरण झाले आहे. पुण्याच्या सुप्रसिद्ध गुडलक कॅफेचे दर्शनही या चित्रपटामध्ये घडते.
pune2
‘तुंबाड’ या थरारपटाचे चित्रीकरण पुण्याच्या जवळ असलेल्या पुरंदरे वाड्यामध्ये झाले आहे, तर वरूण धवन अभिनीत ‘बदलापूर’ चित्रपटाच्या बहुतेक भागांचे चित्रीकरण ही पुण्यात झाले आहे. चित्रपटाच्या सुरुवातीला गाडीने पाठलाग करीत असलेले दृश्य पुण्याच्या ‘कॅम्प’ भागामध्ये चित्रित झाले असून, प्रभात रोड आणि कॅफे कोलंबिया या ठिकाणीही या चित्रपटातील दृश्ये चित्रित करण्यात आली आहेत. माधुरी दीक्षित अभिनीत मराठी चित्रपट ‘बकेट लिस्ट’ देखील पुण्यातच चित्रित झालेला आहे. या चित्रपटामध्ये माधुरीने पुणेरी गृहिणी साकारली आहे, तर दर्शकांचा आवडत्या ‘मुन्नाभाई’ने ‘एमबीबीएस’ केलेले कॉलेज वास्तविक पुण्याचे कृषी महाविद्यालय आहे. श्रीदेवीने साकारलेली ‘शशी गोडबोले’ ही मराठमोळी, गृहकृत्यदक्ष गृहिणी आणि तिचा इंग्रजी शिकण्याचा प्रवास दर्शविणाऱ्या ‘इंग्लिश विन्ग्लीश’ चित्रपटाचे चित्रीकरणही पुण्यातील मॉडेल कॉलनी भागामध्ये झालेले आहे.

Leave a Comment