‘एनटीआर’चा नवा प्रोमो रिलीज

NTR
प्रेक्षक आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री एनटीआर यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. या ट्रेलरमध्ये एनटीआर यांचा चित्रपटसृष्टीपासून राजकारणापर्यंतचा प्रवास पाहायला मिळला. या चित्रपटाचा नवा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या नव्या प्रोमोमुळे चाहत्यांमध्ये चित्रपटाबद्दलची उत्सुकता आणखी वाढली आहे.

अभिनेत्री विद्या बालनची झलकही या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. विद्या या चित्रपटातून तेलुगू सिनेसृष्टीत पदार्पण करत असल्याने तिच्या चाहत्यांसाठी हा चित्रपट अधिक खास असणार आहे. विद्याशिवाय नंदामुरी बालाक्रिष्णा आणि राणा दग्गुबत्ती या कलाकारांच्याही चित्रपटात मुख्य भूमिका आहेत.

२ भागात ‘एनटीआर बायोपिक’ हा प्रेक्षकांना दाखवण्यात येणार आहे. पहिल्या भागाचे शीर्षक ‘कथानायकुडू’ असून दुसऱ्या भागाचे ‘महानायकुडू’ असे शीर्षक आहे. राजकारणासोबतच अभिनयातही नाव कमवलेले एनटीआर यांच्या जीवनप्रवासावर आधारित हा चित्रपट तेलुगू, तमिळ आणि हिंदी भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.