नवी दिल्ली – केंद्रीय कृषीमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत लढणार नाही असे पुन्हा एकदा सांगतानाच पुढील सरकारमध्येही मी नसेन असे स्पष्ट केले आहे. पुढील सरकारमध्ये मी मंत्री नसेन व याचा मला आनंदच आहे असे त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले.
पवार म्हणाले की मनमोहन सिंग सरकारमध्ये आम्ही सहभागी होतो याचे समाधान आहे. केंद्रीय मंत्रीपदाचा आनंद घेतला आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हेही सरकारत सहभागी झाले असते तर ते अधिक उचित ठरले असते. त्यांनी प्रत्यक्ष कामकाजात सहभागी होऊन प्रशासनातले आपले कौशल्य दाखविणे आवश्यक आहे मात्र राहुल यांची भेट आत्तापर्यंत एक दोनदाच झाली आहे. त्यामुळे त्यांची पुरेशी ओळख आपल्याला नाही व त्यामुळे त्यांच्या कामासंबधीही आपण कांही सांगू शकणार नाही असेही ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे नेते व केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांनीही पवार साहेब लोकसभेची निवडणूक लढणार नसले तरी राज्यसभेतून पार्लमेंटवर येणार असल्याचे सांगून आगामी निवडणुकांनंतरही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच राहील असेही स्पष्ट केले आहे.