गौतम गंभीरसारखा आळशी माणूस कधीच पाहिला नाही… सहकारी खेळाडूने केली टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची पोलखोल!


टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर अनेकदा सामन्यादरम्यान खूप गंभीर दिसतो. गौतम गंभीर मनमोकळेपणाने हसताना दिसणे फार कमी आहे. याशिवाय गौतम गंभीरची प्रतिमा अशी आहे की तो खूप मेहनती आहे. त्याच्या मेहनतीमुळे तो टीम इंडियाच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक बनला आहे आणि आता तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षकही आहे, यात शंका नाही. मात्र, गौतम गंभीरबाबतही एक सत्य आहे, जे दिनेश कार्तिकने उघड केले आहे. गौतम गंभीरच्या 42 व्या वाढदिवसानिमित्त दिनेश कार्तिकचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो या खेळाडूची पोलखोल करताना दिसत आहे.

गंभीरच्या वाढदिवसानिमित्त स्टार स्पोर्ट्सने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यामध्ये दिनेश कार्तिक या खेळाडूच्या आळशीपणाची कहाणी सांगत आहे. दिनेश कार्तिकने या व्हिडिओमध्ये सांगितले की, ‘वर्ष 2002 मध्ये गौतम गंभीर टीम हॉटेलच्या रूममध्ये पडलेला होता. त्याचा दरवाजा किंचित उघडा होता. मी त्याच्या खोलीतून बाहेर येत होतो आणि मग अचानक गंभीरने मला हाक मारली. जेव्हा मी गंभीरच्या खोलीत गेलो, तेव्हा त्याने मला त्याच्या टीव्हीचे चॅनल बदलण्यास सांगितले.


दिनेश कार्तिक पुढे म्हणाला, गंभीरकडून हे ऐकून मला धक्काच बसला. रिमोट त्याच्यापासून दोन पावले दूर होता, पण हा खेळाडू त्याच्या जागेवरून हलत नव्हता. यापेक्षा आळशी माणूस मी कधीच पाहिला नाही. मी चॅनल बदलला आणि त्यानंतर गौतम गंभीरने मला तिथून जाण्यास सांगितले. हा किस्सा ऐकून इरफान पठाण आणि हरभजन सिंगलाही हसू आवरता आले नाही.