
भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माने चेन्नईमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खळबळ उडवून दिली आहे. या सामन्यात तिने कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. आता तिने द्विशतक झळकावून नवा इतिहास रचला आहे. शेफालीने अवघ्या 194 चेंडूत द्विशतक झळकावून महिला क्रिकेटमधील सर्वात जलद द्विशतक ठोकण्याचा विक्रमही केला आहे. यापूर्वी हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या ॲनाबेल सदरलँडच्या नावावर होता. 2024 मध्येच तिने फेब्रुवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 248 चेंडूत द्विशतक झळकावले होते. याआधीही हा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनच्या नावावर होता, जिने 2001 मध्ये इंग्लंडविरुद्ध 306 चेंडूत द्विशतक झळकावले होते.
शेफाली वर्माने चेन्नई कसोटीत उडवून दिली खळबळ, सर्वात वेगवान द्विशतक झळकावून रचला इतिहास
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अशा परिस्थितीत शेफाली वर्मा तिची सलामीची जोडीदार स्मृती मनधानासोबत फलंदाजीसाठी क्रीझवर आली. सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये ती थोडी सावधपणे खेळली, पण खेळपट्टी समजून घेतल्यानंतर ती थांबली नाही. तिने सतत धावा केल्या आणि अवघ्या 113 चेंडूत शतक झळकावले. दुसऱ्या बाजूने दोन विकेट पडल्या, तरीही तिने पुढे चालत राहून अवघ्या 194 चेंडूत द्विशतक झळकावले. दुहेरी शतक झळकावणारी ती जगातील 10वी आणि भारतातील दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे. मिताली राजने 2002 मध्ये भारतासाठी द्विशतक झळकावले होते. आता 22 वर्षांनंतर शेफालीने ही कामगिरी केली आहे.
HISTORY CREATED BY SHAFALI VERMA.
– The fastest to score a double century in women's Test match. 🫡🇮🇳pic.twitter.com/FVa4DTa8dO
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) June 28, 2024
यापूर्वी शेफाली वर्माने स्मृती मनधानासोबत 292 धावांची विक्रमी सलामी भागीदारी केली होती. यासह दोघांनी पाकिस्तानचा 20 वर्ष जुना विक्रम मोडला. याआधी हा विक्रम पाकिस्तानच्या साजिदा शाह आणि किरण बलोचच्या नावावर होता. 2004 साली या दोघांनी वेस्ट इंडिजविरुद्ध पहिल्या विकेटसाठी 241 धावांची भागीदारी केली होती. एवढेच नाही, तर शेफाली आणि मनधाना ही कोणत्याही विकेटसाठी सर्वाधिक धावांची भागीदारी करणारी जगातील दुसरी जोडी ठरली आहे.
स्मृती मनधानाच्या 149 धावांच्या शानदार खेळीनंतर शेफालीच्या स्फोटक द्विशतकाने भारतीय संघ मजबूत स्थितीत पोहोचला आहे. वृत्त लिहेपर्यंत तिसऱ्या सत्रात संघाने केवळ 2 गडी गमावून 399 धावा केल्या आहेत. शेफालीसोबत जेमिमा रॉड्रिग्जही 31 धावा करून क्रीजवर हजर आहे.
