महिलांना 1500 रुपये, 3 मोफत गॅस सिलेंडर, शेतकऱ्यांना कर्जमाफी… जाणून घ्या महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पातील महत्त्वाच्या गोष्टी


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी 2024-25 या आर्थिक वर्षाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांना दरमहा 1500 रुपये आणि वर्षाला तीन सिलेंडरसह शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवार यांनी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना 1500 रुपये मासिक भत्ता देण्याची आर्थिक सहाय्य योजना जाहीर केली. अजित पवार म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना” ही योजना राज्यात ऑक्टोबरच्या निवडणुकांच्या चार महिने आधी जुलैपासून लागू केली जाईल. या योजनेसाठी वार्षिक अर्थसंकल्पात 46,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आणखी एका कल्याणकारी योजनेची घोषणा करताना अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पाच सदस्यांच्या पात्र कुटुंबाला ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने’ अंतर्गत दरवर्षी तीन मोफत एलपीजी सिलेंडर मिळतील.

महाराष्ट्र विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू आहे. अजित पवार यांनी विधानसभेत सांगितले की, महाराष्ट्रातील 44 लाख शेतकऱ्यांची वीज बिलाची थकबाकी माफ केली जाईल. पवार म्हणाले की, पिकाच्या नुकसानीची भरपाई म्हणून देय असलेली कमाल रक्कम पूर्वी 25 हजार रुपये होती, ती आता 50,000 रुपये करण्यात आली आहे.

कांदा उत्पादकांना अनुदान
कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यासाठी 850 कोटी रुपयांपेक्षा जास्त अनुदान 350 रुपये प्रति क्विंटल या स्वरूपात देण्यात आले आहे. कांदा आणि कापूस हमी भावाने खरेदी करण्यासाठी 200 कोटी रुपयांचा रिव्हॉल्व्हिंग फंड तयार करण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री म्हणाले.

शेतकऱ्यांसाठी योजना
शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे ते म्हणाले. बियाणांसाठी अनुदान, सिंचन सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर, शेतमालाची साठवणूक आदींबाबत विविध योजना राबविण्यात येत आहेत. ते म्हणाले की, 2023-24 या आर्थिक वर्षापासून शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी, एक रुपयात पीक विमा या योजना सुरू करण्यात आल्या आहेत.

विदर्भ आणि मराठवाड्यातील 16 जिल्ह्यांमध्ये या योजना यशस्वीपणे पूर्ण करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 6 हजार कोटी रुपयांच्या या प्रकल्पांचा दुसरा टप्पा 21 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येणार आहे.

मृत्यूसाठी भरपाई
उपमुख्यमंत्री म्हणाले की, राज्य सरकारने प्राण्यांच्या हल्ल्यांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या भरपाईमध्ये वाढ केली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प सादर करताना ते म्हणाले की, मृतांच्या कुटुंबाला पूर्वीच्या 20 लाख रुपयांऐवजी 25 लाख रुपये मिळतील.

शेतकऱ्यांना बोनस
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील कापूस आणि सोयाबीन पिकांसाठी सर्व शेतकऱ्यांना हेक्टरी 5 हजार रुपये बोनस देण्याचा आमचा विचार आहे. याशिवाय 1 जुलै 2024 नंतरही आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपये बोनस देत राहू.

विद्यार्थिनींना मदत
इतर मागासवर्गीय आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील दोन लाखांहून अधिक मुलींना राज्य सरकारकडून आर्थिक मदत मिळणार आहे. राज्य सरकार दरवर्षी दोन हजार कोटी रुपयांचा बोजा उचलणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बचत गटासाठी निधी वाढवला
अजित पवार म्हणाले की, महाराष्ट्रात सहा लाखांहून अधिक महिला बचत गट (एसएचजी) कार्यरत असून त्यांची संख्या सात लाखांपर्यंत वाढवण्यात येईल. त्यासाठीचा निधी 15,000 रुपयांवरून 30,000 रुपयांपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.