सावंतवाडी – कॉंग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी हा तळकोकणात रंगलेला सामना अजून संपुष्टात आलेला नाही. आमदार केसरकर आणि त्यांचे समर्थक हे राष्ट्रवादी पक्षातून बाहेर गेले असले तरी ते स्थानिक असल्याने राणे पिता-पुत्रांची कोंडी अजून कायम आहे मात्र राष्ट्रवादीकडून राणेंना दिलासा देण्याचेच काम अजूनही सुरुच आहे.
खुद्द राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राणेंना ग्वाही दिली असली तरी पक्षातून त्यांना चिंता नको असे सबुरीचे सल्ले दिले जात आहेत. त्यातूनच पक्षापेक्षा कोणीही मोठा नाही, केसरकर म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नाही. जे राष्ट्रवादीचे सच्चे कार्यकर्ते आहेत, तेच काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचा धर्म पाळतील, असा विश्वास राष्ट्रवादीच्या पक्षनिरीक्षक व माजी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी व्यक्त केला आहे .
खासदार डॉ. निलेश राणे हे सुसंस्कृत व सुशिक्षित आहेत. त्यांनी मतदारसंघासाठी चांगले काम केले. केंद्राच्या विविध योजना त्यांनी राबवल्या. विजयासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सच्चे कार्यकर्ते नक्कीच सहभाग घेतील आणि लाखोंच्या मताधिक्क्याने डॉ. राणे विजयी होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोणी स्वत:चे अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करत असेल तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांना धडा शिकवतील, असा इशाराही म्हात्रे यांनी दिला. राष्ट्रवादीचे नाव घेऊन जातीयवादी शक्तींना पाठिंबा देणा-यांवर कारवाई अटळ आहे, असेही त्यांनी सूचित केले.मात्र त्याचा कितपत परिणाम होतो यासाठी मतमोजणीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.