वॉशिंग्टन : युक्रेनमधील फुटीरवाद्यांना रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी आपला प्रभाव वापरून शांत करावे. अन्यथा या कारवाईसाठी रशियाला त्याची किंमत चुकवावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष ओबामा यांनी पुतीन यांच्याशी झालेल्या दूरध्वनी चर्चेत दिला.गेल्या काही दिवसांत सशस्त्र रशियन सर्मथकांनी पूर्व युक्रेनमधील अनेक इमारतींचा ताबा घेतला. युक्रेन सरकार इशारा देऊनही लष्करी कारवाई करू शकले नाही. त्यामुळे फुटीरवाद्यांच्या नियंत्रणाखालील क्षेत्र वाढले आहे.
हे बंडखोर कीवमध्ये सरकारला कमकुवत आणि अस्थिर बनविण्याच्या धमक्या देत आहेत. बेकायदा गटांनी शस्त्रे खाली ठेवली पाहिजेत यावर ओबामांनी दूरध्वनी संवादात जोर दिला. पुतीन यांनी आपला प्रभाव वापरून सशस्त्र रशियन सर्मथकांना त्यांनी ताब्यात घेतलेल्या इमारती खाली करण्यास सांगावे, असेही ओबामांनी त्यांना सांगितल्याचे व्हाईट हाऊसच्या निवेदनात म्हटले आहे.तणाव निवळण्यासाठी युक्रेनच्या सीमेवरील रशियन सैन्य मागे घेतले पाहिजे. युक्रेनमधील हस्तक्षेपाची रशिया आधीच किंमत चुकवत असताना पुढील काळात त्यात वाढ होईल, असेही ओबामा यांनी स्पष्ट केले.