मतदान हे तर कर्तव्य

भारताची राज्यघटना तयार होत असतानाच्या काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि पंडित जवाहरलाल नेहरू हे भारतातल्या सरसकट सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क द्यावा याबाबत आग्रही होते. काही लोक मात्र मर्यादित लोकांनाच हा अधिकार असावा या मताचे होते. यावर बरेच वाद झाले. कारण काही लोकांच्या मते सरसकट सर्वांना मतदानाचा अधिकार देणे हे घातक होते. अगदी अशिक्षित लोकांना मतदानाचा अर्थ सुद्धा नीट कळत नाही असे त्यांचे म्हणणे होते. या लोकांचे म्हणणे ऐकून भारतातला मतदानाचा अधिकार सुशिक्षित लोकांपुरताच मर्यादित केला गेला असता तर फार विचित्र स्थिती निर्माण झाली असती. केवळ सुशिक्षितांनाच मतदानाचा अधिकार असेल असा निर्णय घेतला गेला असता तर देशातली मतदानाची टक्केवारी ३० किंवा ४० टक्केच राहिली असती. गमतीचा भाग असा आहे की, फक्त ज्यांना आणि ज्यांनाच मतदानाचा अधिकार असावा असा आग्रह धरला जात होता तेच लोक मतदानाच्या दिवशी दांडी मारत आहेत. ज्यांना मतदानाचा अधिकार देणे घातक ठरेल असे म्हटले गेले होते ते गरीब, अशिक्षित लोक मात्र उत्साहाने रांगा लावून मतदान करताना दिसतात. म्हणजे घटना परिषदेतल्या उच्चभ्रू लोकांनी ज्यांना मतदानाचा अधिकार असावा असे म्हटले होते ते लोक मतदानाच्या कर्तव्याविषयी उदासीन आहेत. उलट ज्यांना अधिकार असू नयेत असे म्हटले होते ते मात्र कसलाही आळस न करता मतदान करताना दिसतात. अशी ही विपरीत स्थिती आहे. आपले मत कोणालाही असो किंवा आपल्या मतदारसंघात उभ्या असलेल्या एकालाही नसो पण आपण कर्तव्य म्हणून मतदान केले पाहिजे कारण ते आपले कर्तव्य आहे. ते कर्तव्य लोकशाहीप्रती, देशाप्रती किंवा कोणत्या पक्षाप्रती नसते तर ते आपल्याप्रती असते, आपल्या हितासाठी असते. ही जाणीव ठेवून आवर्जुन मतदान केले पाहिजे. आपले पुढचे पाच वर्षांचे आयुष्य कसे असावे हे आपल्या मतदानाने ठरत असते कारण आपल्या देशाचा कारभार पाहणारे कारभारी आपण मतदानातून निवडत असतो. मतदानाच्या अधिकाराचा अर्थ नीट समजून घेण्याची गरज आहे. भारताची लोकशाही ही लोकांनी चालवलेली राज्यपद्धती आहे. पण देशातला प्रत्येक नागरीक लोकसभेत जाऊन राज्य कारभारावर चर्चा करू शकत नाही, म्हणून त्याने आपले प्रतिनिधी लोकसभेत पाठवून त्यांच्यामार्फत देशाचा कारभार पहावा अशी अपेक्षा आहे. हे प्रतिनिधी जेवढे चांगले असतील तेवढा देशाचा कारभार चांगला होईल आणि लोकांच्या हिताचा होईल. मात्र याबाबतीत प्रत्येक नागरिकाने मतदान करून आपले मत व्यक्त केले पाहिजे. जे लोक मतदान करणार नाहीत ते देशाच्या कारभाराच्या बाबतीत उदासीन आहेत असे म्हणावे लागेल. ही उदासीनता झटकून प्रत्येकाने आवर्जून मतदान केले पाहिजे. आपल्या देशात मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याची पद्धत आहे. खरे म्हणजे प्रत्येक कर्मचार्‍याला कार्यालयीन कामातून थोडी सुट्टी दिली तर तो मतदान करून येऊ शकतो. त्याला पूर्ण दिवस सुट्टी देण्याची गरज नाही. परंतु लोकांच्या मनात मुळातच मतदानविषयी उदासीनता असते, त्यातच काम लागले तर मतदान टाळण्यास लोक तेवढाच बहाणा सांगत बसतील म्हणून मतदानादिवशी सार्वजनिक सुट्टी देण्याचा नियम सरकारने केला आहे. मात्र काही लोक सुट्टी मिळून सुद्धा मतदान करत नाहीत. सुट्टीचा फायदा घेऊन सहकुटुंब सहलीला जाण्याचा आनंद लुटतात. सहलीचा आनंद लुटायला काही हरकत नाही, पण सकाळी सकाळी लवकर मतदान करून वाटल्यास अशा लोकांनी सहलीला जावे. मात्र अशी सोय असून सुद्धा असे लोक मतदानाला दांडी मारून सहल काढतात आणि त्यात त्यांना धन्यता वाटते. त्यांना घटनेने आपल्याला दिलेल्या अधिकाराचा अर्थ कळत नाही. अशा प्रकारे मतदानाला दांडी मारून सहलीला जाणार्‍या लोकांमध्ये मध्यमवर्गीय आणि उच्च मध्यमवर्गीय सुशिक्षित मंडळींचाच मोठा भरणा असतो. या शिकल्या सवरलेल्या लोकांनाच लोकशाहीचे आणि आपल्या अधिकाराचे महत्व कळत नाही. एका विचारवंताने असे म्हटले आहे की, चांगले लोक मतदान करत नाहीत म्हणून वाईट लोक निवडून येतात, हे म्हणणे शब्दश: खरे आहे. भारताच्या संसदेमध्ये गुन्हेगारी लोकांचा भरणा जास्त झाला आहे असे नेहमीच बोलले जाते. विसंगती अशी की, या भरण्याविषयी जे लोक जास्त चर्चा करतात तेच लोक मतदान करण्याबाबत दक्ष नसतात. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खासदारांचा संसदेतला भरणा रोखायचा असेल तर आपण आपला वेळ खर्ची घालून गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेल्या उमेदवाराला आवर्जून मतदान केले पाहिजे हे त्यांच्या लक्षात येत नाही.

Leave a Comment