मुंडेसमर्थकांची वैमानिकाला मारहाण

बीड – भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या बदललेल्या कार्यक्रमामुळे नियोजित ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी जाण्यास नकार देणा-या हेलिकॉप्टर चालकास त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा प्रकार येथे घडला. हे प्रकरण लाऊन धरण्याचा निर्णय हेलिकॉप्टर व्यावसायिकांची संघटना असलेल्या रोटरी विंग सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने घेण्यात आला आहे. 

बीड येथे सभा पार पडल्यानंतर मुंडे यांचा कार्यक्रम बदलल्याने त्यांना नियोजित ठिकाणापेक्षा वेगळ्या ठिकाणी जायचे होते. त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांमार्फत याबाबतचा निरोप त्यांच्या हेलिकॉप्टर चालकाला कळविला. मात्र निवडणूक काळात घालून दिलेल्या नियमानुसार हा बदल करणे शक्य नसल्याचे संबंधित चालकाने सांगितले. त्यानंतर मुंडे यांनी कारद्वारे प्रवास करण्याचा निर्णय घेतला आणि ते रवाना झाले. मुंडे निघून गेल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांनी या हेलिकॉप्टर चालकाला मारहाण केली. हा चालक भारतीय वायूसेनेतून निवृत्त झाला आहे.