मनसेचा रंग पडला फिका

राज ठाकरे यांनी महायुतीत येण्याचा प्रयत्न केला पण तो यशस्वी होत नाही असे दिसायला लागताच स्वतंत्रपणे निवडणुका लढवण्याची घोषणा केली. मात्र तसे करताना त्यांनी आपला पाठींबा मोदींनाच असेल असे जाहीर करून भाजपा-सेना युतीला पेचात पकडले. त्यांच्या या चालीने  भाजपा-सेना युतीचे नेते तर चक्रावूनच गेले. पण आता लक्षात यायला लागले आहे की राज ठाकरे यांच्या चालीने युती नाही तर राज ठाकरेच अडचणीत येत आहेत. कारण   राज ठाकरे मोदींच्या नावाचा जप करीत असले तरीही ते काही मोदींच्या पक्षाचेही नाहीत आणि मोदींच्या आघाडीतही नाहीत. अशा स्थितीत मोदी पंतप्रधान व्हावेत असे मानणारा मतदार मोदींसाठी मनसेला मत द्यायला तयार नाही. उगाच कोणी तरी कोणाचे नाव घेतले म्हणजे लोक त्यांना मत देत नाहीत. गेल्या दोन तीन दिवसांत राज ठाकरे शिवसेने विषयी शिवराळ भाषा वापरून त्यांच्या  मनातले मोदी प्रेम किती बेगडी आहे हे दाखवत आहेत. ज्याला मोदीविषयी प्रेम आहे तो शिवसेनेला असा टाकून कधीच बोलणार नाही.  एकंदरीत मनसेला मोदी समर्थकांची मते मिळण्याची शक्यता मावळत आहे. 

असल्या डावपेचांनी सुरूवातीला धक्का बसतो पण काही दिवस जाताच त्या डावात कसे तथ्य नाही हे दिसायला लागते आणि सुरूवातीला बसलेला धक्का कमी व्हायला लागतो. भाजपा-सेना युतीत पाचर मारण्या साठी राज ठाकरे यांनी टाकलेला मोदी डाव आता कळायला लागला आहे   तो त्यांच्यावर उलटला आहे. राज ठाकरे यांना २००९ सालच्या निवडणुका जिंकायला कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांनी बरीच रसद पुरवली होती. ते शिवसेनेची मते खात असल्यामुळे आणि त्याचा आपल्याला फायदा होत असल्यामुळे कॉंग्रेसने मनसेला ही रसद पुरवली होती. आता भाजपा-सेना युतीला खिजवण्यासाठी त्यांनी मोदी नावाची जी पाचर मारली आहे ती कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीला फारशी पटलेली नाही. आज मोदी ही कॉंग्रेससाठी पीडा झाली आहे. तेव्हा मोदींचा प्रचार करणार्‍या पक्षाला ते आता मदत द्यायला तयार नाहीत. म्हणजे राज ठाकरे यांनी मोदींच्या नावाने मिळणारी मतेही गमावली आहेत आणि कॉंग्रेसचीही सहानुभूती गमावली आहे. राज ठाकरे यांना मृदुंग दोन्ही बाजूंनी थपडाच खायला लागला आहे. त्यांचा उथळपणा उघड झाला आहे.  त्यांच्यासारख्या उथळ डावपेचांना फारसे यश येत नाही कारण केवळ डावपेच कामाला येत नसतात. त्या डावपेच खेळणाराला चांगले जनसमर्थन असावे लागते.  ते राज ठाकरे यांच्याकडे नाही पर्यायाने त्यांना कसलेही डावपेच फार ताकदीने लढवता येत नाहीत.

त्यांच्यात मोठी ताकद असून ते फार मुत्सद्दी नेते आहेत असे मत शरद पवार यांचे मत आहे. ते खरे नाही हे पवारांनाही माहीत आहे पण राजकारणाचा एक भाग म्हणून आपण तसे बोलत  आहोत  हे ते जाणतात. राज ठाकरे यांनी गेल्या दोन तीन दिवसांत आपला पोरकटपणाही पूर्णत: प्रकट केला आहे. आपण बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला असल्याचा उद्धव ठाकरे यांचा आरोप फेटाळताना राज ठाकरे यांनी जे काही सांगितले त्यात कसलाही पोक्तपणा नव्हता. राज ठाकरे आता निवडणुकीच्या तोंडावर बाळासाहेब आणि मोदी यांची नावे घेत आहेत. ते आज बाळासाहेबांची आरती ओवाळत असले तरीही त्यांच्या हयातीत राज यांनी शिवसेनेतून बाहेर पडून केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी नवा पक्ष स्थापन केला. त्यांचे हे कृत्य म्हणजे पाठीत खंजीर खुपसणे होय. ही अगदी साधी गोष्ट आहे पण तिला कसलेही तर्कशुद्ध उत्तर देण्याऐवजी राज ठाकरे यांनी माजघरातले हेवेदावे बाजारात आणले. त्याही गोष्टीत काही तथ्य नाही. उद्धव ठाकरे आणि त्यांचे कुटुंबीय बाळासाहेबांना बटाटेवडे खायला घालून त्यांचा छळ करीत होते आणि आपण त्यांची या छळातून सुटका करून चिकन सूप पाठवत गेलो. अशी फुशारकी त्यांनी मारली आहे. 

उद्धवकडून दिेले जाणारे बटाटेवडे अगदी लहान होते आणि तेलकट होते असा राज यांचा आरोप आहे. आता एखाद्या रुग्णाला लहान बटाटेवडे देणे हा काय त्याचा छळ होतो का? ते वडे काय कोणी तपासून पाहिले होते ? ते वडे तेलकट होते तर राज ठाकरे पाठवत होते ते चिकन सूप काय तेल विरहित होते का ? उलट ते वड्यांपेक्षा जास्त चरबीयुक्त असते. ते चवीला छान असेल  पण प्रकृतीला चांगले होते याचे काय प्रमाण? बाळासाहेब  कोमात जाईपर्यंत आपण पाठवलेले सुपच पीत होते आणि त्यावरच रहात होते ( की ते सूप पिऊनच ते कोमात गेले?) असे राज ठाकरे म्हणतात. आता ते केवळ सूपच पीत होते आणि दुसरे काही खातच नव्हते यावर केवळ राज तावातावात सांगतात म्हणूनच विश्‍वास ठेवायचा ना ?   उद्धव ठाकरे आपल्या वडिलांना काही खायला देत नव्हते आणि आपण त्यांना खायला घातले हे राज ठाकरे यांचे म्हणणे कोणी तरी मानेल का ? राज ठाकरे यांना बाळासाहेबांविषयी एवढे प्रेम होते तर बाळासाहेबांना जी शिवसेना प्राणाहून प्रिय होती ती फोडण्याचे पाप राज यांनी त्यांच्या हयातीत का केले ? बाळासाहेबांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही वर्षात आपण हे पाप करीत आहोत याचे भान त्यांना का आले नाही ? कोणीही वृद्ध व्यक्ती आजारी असली की जवळपासचे नातेवाईक त्यांना हवे नाही पहात असतातच.  पण त्यातले कोणीही आपण त्यांना कसा चहा पाजला आणि त्यांना कशी पेज पाजली याचा हिशेब लाखा लाखाच्या सभेत सांगायला लागला तर त्याला कोणीही पोरकटपणाच म्हणेल.