मी नरेंद्र मोदींना भेटलो नाही-शरद पवार

नवी दिल्ली – भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्याबरोबर गुप्त बैठक केल्याचे वृत्त राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी फेटाळून लावले आहे.

गेल्या वर्षभरात मी नरेंद्र मोदींना एकदाही भेटलेलो नाही. दिल्लीतील मुख्यमंत्र्यांची परिषद वगळता मी नरेंद्र मोदींना कधीही भेटलेलो नाही असे शरद पवार यांनी ट्विटरवरुन स्पष्ट केले आहे. मराठीतील एका आघाडीच्या वर्तमानपत्राने शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यामध्ये नवी दिल्लीत १७ जानेवारीला गुप्त बैठक झाल्याचे वृत्त दिले आहे.

त्या पार्श्वभूमीवर पवारांनी हा खुलासा केला आहे. मी नरेंद्र मोदींची भेटी घेतल्याचे वृत्त संपूर्णपणे चूकीचे, आधारहीन आणि खोडकरपणाचे असल्याचे शरद पवारांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी एका मुलाखतीत गुजरात दंगलींसाठी नरेंद्र मोदींना जबाबदार धरल्यानंतर दोनच दिवसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी गुजरात दंगलींसंदर्भात बोलताना नरेंद्र मोदींना न्यायालयाने क्लीनचीट दिल्याचे विधान केले होते.

त्यानंतर राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांच्या विधानाचा बचावही केला होता. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जवळीक वाढू लागल्याची चर्चा सुरु आहे.