न्यूझीलंडने मालिका ४-० ने जिंकली

वेलिंग्टन – दक्षिणआफ्रिके पाठोपाठ न्यूझीलंडमध्येही भारतीय संघाचा धुव्वा उडाला आहे. अखेरचा एकदिवसीय सामना ८७ धावांनी जिंकून न्यूझीलंडने मालिकेत ४-० असे निर्भेळ यश मिळवले.

न्यूझीलंडच्या ३०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा डाव २१६ धावांवर संपुष्टात आला. भारतीय संघाने गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही आघाडयांवर सपशेल निराशा केली. विराट कोहली (८२) आणि कर्णधार महेंद्रसिंह ढोणी (४७) वगळता अन्य फलंदाजांनी न्यूझीलंडच्या भेदक गोलंदाजीसमोर नांगी टाकली.

न्यूझीलंडकडून एमजे हेनरीने सर्वाधिक चार गडी बाद केले. त्याला केन विल्यमसन आणि मिल्सने प्रत्येकी दोन गडी बाद करुन चांगली साथ दिली. भारतीय गोलंदाजांनी धावा उधळल्यानंतर निदान फलंदाज तरी प्रतिकार करतील अशी अपेक्षा होती. मात्र फलंदाजांनीही गुडघे टेकले.

या मालिकेतील तिसरा सामना वगळता एकाही सामन्यात भारतीय संघाला आपली कामगिरी उंचावता आली नाही. भारताने आधीच मालिका गमावल्यामुळे हा सामना फार महत्वाचा नव्हता मात्र प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तर भारत हा सामना जिंकेल अशी अपेक्षा होती.

तत्पूर्वी मालिकेतील पाचव्या आणि अखेरच्या एकदिवसीय सामन्यात प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने भारतासमोर विजयासाठी ३०४ धावांचे लक्ष्य ठेवले होते. रॉस टेलरने (१०२) मालिकेतील सलग दुसरे शतक झळकवताना केन विल्यमसन (८८) सोबत तिस-या गडयासाठी १५२ धावांची भागीदारी केली.

मागच्या सामन्याप्रमाणे याही लढतीत केन विल्यमसन आणि रॉस टेलरने भारतीय गोलंदाजीची हवा काढून टाकली. मार्टीन गुप्टिल आणि जेसी रायडर झटपट बाद झाल्यानंतर टेलर आणि विल्यमसन जोडीने सामन्याची सारी सूत्रे आपल्या हाती घेत न्यूझीलंडच्या डावाला आकार दिला.

भारतीय गोलंदाजांनी या सामन्यातही सपशेल निराशा केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांना वेसण घालण्यात भारतीय गोलंदाज पूर्णपणे अपयशी ठरले. भारताकडून वरुण अ‍ॅरॉनने दोन गडी बाद केले. भुवनेश्वर कुमार, मोहोम्मद शामी आणि विराट कोहलीने प्रत्येकी एक गडी बाद केला.

दरम्यान भारताने आज नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. भारताने आधीच मालिका गमावल्यामुळे हा सामना फार महत्वाचा नाही मात्र प्रतिष्ठा वाचवण्यासाठी तरी भारताने हा सामना जिंकणे आवश्यक आहे.

Leave a Comment