सोनिया गांधी २०१६ साली निवृत्त होणार

नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वयाला २०१६ साली ७० वर्षे पूर्ण होणार आहे. त्यावेळी त्या राजकारणातून निवृत्त होणार आहेत. त्याचमुळे राहुल गांधी यांच्यावर पक्षाची अधिक जबाबदारी सोपविण्यात आली आहे, असे एका पुस्तकात नमूद करण्यात आले आहे. रशीद किडवाई यांनी लिहिलेल्या ‘२४ अकबर रोड’ या पुस्तकामध्ये हा उल्लेख करण्यात आलेला आहे. या पुस्तकाचे प्रकाशन पूर्वीच झाले आहे. परंतु नुकतीच त्याची सुधारून वाढवलेली आवृत्ती प्रसिद्ध करण्यात आली असून या आवृत्तीत या निवृत्तीचा उल्लेख करण्यात आला आहे.

सोनिया गांधी यांनी आपल्या या निवृत्तीचा निर्णय जाहीर केला तेव्हा कॉंग्रेसचे नेते अस्वस्थ झाले. आजपर्यंत या देशातला कोणताही राजकीय नेता असा घोषणा करून निवृत्त झालेला नाही आणि राजकारण्यांना निवृत्तीचे वय नसते. तेव्हा सोनिया गांधी यांनी आपला हा निवृत्तीचा विचार बदलावा, अशी त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न या नेत्यांनी केला. परंतु सोनिया गांधी आपल्या विचारावर ठाम राहिल्या.

२०१२ साली ९ डिसेंबर रोजी झालेल्या आपल्या वाढदिवसाच्या खाजगी कार्यक्रमात सोनिया गांधी यांनी कॉंग्रेस पक्षाच्या काही ज्येष्ठ कार्यकर्त्यांशी बोलताना आपला हा विचार बोलून दाखवला. त्यावर बरीच चर्चा झाली आणि सोनिया गांधी आपल्या निश्‍चयावर ठाम असल्याचे दिसले तेव्हा या नेत्यांनी, निदान राहुल गांधी यांच्यावरची जबाबदारी तरी वाढवली जावी अशी विनंती सोनिया गांधी यांना केली.

राहुल गांधी यांची जबाबदारी वाढविण्याचा निर्णय नेत्यांनी घेतला असला तरी राहुल गांधी त्यास तयार नव्हते. मात्र पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी त्यांचे मन वळवले. राहुल गांधी जबाबदारी घेण्यास तयार होत नसल्यामुळे पक्ष आणि सरकार या दोन्हींचे मोठे नुकसान होत असल्याचे मनमोहनसिंग यांनी त्यांच्या नजरेस आणून दिले. हे नुकसान टाळण्यासाठी राहुल गांधी यांनी दोन्ही स्तरावर जबाबदारी स्वीकारावी, अशी विनंती मनमोहनसिंग यांनी त्यांना केली. त्यावर राहुल गांधी यांनी संघटनेची जबाबदारी स्वीकारण्याचे मान्य केले. आता राहुल गांधींनी जबाबदारी स्वीकारली असली तरीही कॉंग्रेसचे नेते सोनिया गांधी यांच्या निर्णयामुळे अजूनही अस्वस्थ आहेत.