जनता दल (यू) मध्ये आघाडीबाबत संभ्रम

पाटणा – बिहारमध्ये सत्तेवर असलेल्या जनता दल (यू) पक्षाच्या नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांच्या मनात कॉंग्रेसशी आघाडी करावी की नाही, या संबंधात संभ्रमाची स्थिती असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अजूनही २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात त्याचा निर्णय होत नाही. मुख्यमंत्री नितीशकुमार यांना मोदी यांच्या स्पर्धेने एवढे ग्रासले आहे की, मोदी यांचा पराभव करण्यासाठी का होईना पण कॉंग्रेसशी युती केली पाहिजे असे त्यांचे मत आहे. म्हणून ते कॉंग्रेसकडे झुकले असल्याचे दिसत आहे.

नितीशकुमार यांच्या कल्पनेला पक्षातून दोन कारणांमुळे विरोध आहे. पहिले कारण म्हणजे जनता दल (यू) हा पक्ष मुळात कॉंग्रेसविरोधी आहे आणि दुसरे कारण म्हणजे बिहारमध्ये कॉंग्रेसची फारशी ताकद नाही. म्हणजे कॉंग्रेसशी युती केल्याचा फारसा फायदा पक्षाला होणार नाही. पक्षाचे अध्यक्ष शरद यादव हे फार जुनी समाजवादी नेते आहेत आणि १९७० च्या दशकापासून कॉंग्रेसच्या विरोधात राजकारण करत आलेले आहेत. आता कॉंग्रेसशी युती केल्यास ती आपल्या तत्वांच्या विरोधात असेल असे तर त्यांचे मत आहेच, पण कॉंग्रेसचे मुळातच देशातले महत्व कमी होत आहे, अशा प्रसंगी आपण कॉंग्रेसशी युती करून कॉंग्रेसला बळकट करण्याचे काही कारण नाही असेही त्यांना वाटते.

जनता दल (यू) पक्षाच्या एका नेत्याने याबाबत वेगळे विचार मांडले आहेत. कॉंग्रेस पक्षाने बिहारला स्वतंत्र दर्जा देऊन विकासाचे विशेष पॅकेज दिले तर नितीशकुमार दल आणि जनता दल (यू) पक्ष या दोघांचेही राज्यातले वर्चस्व वाढेल. तेव्हा केंद्रातल्या कॉंग्रेस पक्षाने असा निर्णय घेतला तर आपल्या पक्षाने कॉंग्रेसच्या मागे जाण्यास काही हरकत नाही असे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गटाला वाटते.

कॉंग्रेसचे धोरण आणि बिहारचे राजकारण डोळ्यासमोर ठेवून पक्षातला एक गट असा विचार करत असला तरीही कॉंग्रेस असा दर्जा देण्याची शक्यता नाही, असे अनेक नेत्यांना वाटते. कारण केवळ बिहारला असा दर्जा दिला तर उत्तर प्रदेशात त्याचे पडसाद उमटतील, अशी भीती कॉंग्रेसच्या नेत्यांना वाटते. तेलंगणाच्या निर्णयातून कॉंग्रेसचे हात पोळले आहेत. तेव्हा कुठल्याही प्रादेशिक मागणीच्या बाबतीत कॉंग्रेस पक्ष कसलीही जोखीम घेईल अशी काही शक्यता दिसत नाही. तेव्हा कॉंग्रेसचा विचार करून नये असे पक्षातल्या कार्यकर्त्यांच्या मोठ्या गटाला वाटते.