मंदिरातले सोने घ्यायला भाजपाचा विरोध

हैदराबाद – आयात-निर्यात व्यापारातील तोटा भरून काढण्यासाठी सरकार हिंदू मंदिरातील सोने ताब्यात घेण्याचा प्रयत्न करील तर त्यास भारतीय जनता पार्टीचा विरोध असेल असे भाजपाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे. पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी देशापुढचा आर्थिक पेच हा सोन्यामुळेच उद्भवला असल्याचे म्हटले आहे. त्या पार्श्‍वभूमीवर सरकार मंदिरातले सोने ताब्यात घेण्याची शक्यता आहे. म्हणून सुब्रमण्यम स्वामी यांनी आपला विरोध व्यक्त केला आहे.

रिझर्व्ह बँकेच्या नव्या गव्हर्नरनी तर सोने ताब्यात घेण्याबाबत विविध मंदिराच्या व्यवस्थापनाशी कशी चर्चा करावी याबाबत विचार विनियम सुरू केलेला आहे. अशा प्रकारे सरकार आपल्या चुकीमुळे निर्माण झालेल्या पेच प्रसंगातून सुटका करून घेण्यासाठी मंदिराला तोशीश देत असेल तर आपण सरकारच्या विरोधात न्यायालयात धाव घेऊ असेही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे.

सध्याच्या यूपीए सरकारला देशातली अर्थव्यवस्था हाताळण्यात अपयश आलेले आहे अशीही टीका सुब्रमण्यम स्वामी यांनी केली. रुपयाची किंमत घसरण्यास देशातला भ्रष्टाचार कारणीभूत असल्याचेही ते म्हणाले.