तिरुपती – आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगण राज्य निर्मिती करण्याच्या विरोधात सीमांध्रा भागात सुरू असलेल्या आंदोलनाची झळ सर्वसामान्य माणसाला बसली आहेच पण तिरुपती बालाजी मंदिरालासुध्दा या आंदोलनाचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. बालाजीच्या मंदिराला भेट देणार्या भाविकांची संख्या घटली असून त्यांच्यामुळे येणार्या उत्पन्नावरही परिणाम झाला आहे.
तिरुपतीच्या मंदिराला आंदोलनाची झळ
ऑगस्ट महिन्यामध्ये बालाजीच्या हुंडीत ६१ कोेटी ५० लाख रुपयांच्या रकमा आणि भेटी आल्या. त्या सरासरीपेक्षा १६ कोटी रुपयांनी कमी असल्याचे मंदिराच्या व्यवस्थापनातर्फे सांगण्यात आले. बालाजीच्या दर्शनाला दर महिन्याला सरासरी २३ लाख लोक येतात. २०१२ साली ही सरासरी दिसून आली होती. पण काल संपलेल्या ऑगस्ट महिन्यात ही संख्या १९ लाख ५० हजारावर खाली आली.
असे असले तरी विशिष्ट प्रकारच्या पूजा करण्यासाठी विकल्या जाणार्या तिकिटांवर आणि दर्शन तिकिटांवर फारसा परिणाम झालेला नाही. बालाजीच्या विशेष दर्शनासाठी ३०० रुपयांचे तिकिट घ्यावे लागते. या तिकिटांची विक्री आहे तेवढीच राहिली. विशिष्ट पूजांसाठी भराव्या लागणार्या शुल्कातून या महिन्यात नेहमीप्रमाणेच १५ कोटी ५० लाख रुपये मिळाले.
