आपली सबस्क्रिप्शन फी वाढवणार ॲमेझॉन प्राइम


नवी दिल्ली : चित्रपटगृह, नाट्यगृह कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असल्यामुळे लोकांमध्ये ओटीटीबद्दलची क्रेझ वाढत होती. यामुळे, प्रेक्षक आजही चित्रपटगृहांमध्ये जाण्याऐवजी ओटीटीद्वारे घरी बसून नवीन चित्रपट आणि वेबसिरीजचा आनंद घेण्याला प्रथम प्राधान्य देत आहेत. पण अलीकडेच या प्रेक्षकांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. भारतातील आपले प्राइम मेंबरशिप फी 50 टक्क्यांनी वाढवून 1499 रुपये प्रति वर्ष करण्याची घोषणा ॲमेझॉन प्राइमने केली आहे. आतापर्यंत ही फी 999 रुपये प्रतिवर्ष होती. त्याचबरोबर दरमहा फी आणि तीन महिन्यांचे मेंबरशीप शुल्क देखील कंपनी लवकरच वाढवणार आहे.

ॲमेझॉन नेटफ्लिक्स, अॅपल, फ्लिपकार्ट आणि ई-कॉमर्स साइट्सच्या तुलनेत दरवर्षी 999 रुपयांमध्ये सर्वात स्वस्त मेंबरशीप देत होते. नवीन घोषणेनुसार वार्षिक मेंबरशीप शुल्क 999 रुपयांवरून 1499 रुपये केले जाईल. यासह, तीन महिन्यांची मेंबरशीप 329 रुपयांवरून 459 रुपये केली जाणार आहे. आणि महिन्याला 129 रुपयांची मेंबरशीप आता 179 रुपये होणार आहे. सध्या हा बदल कोणत्या तारखेपासून केला जाईल हे कंपनीने अद्याप स्पष्ट केलेले नाही.

याबाबत अमेझॉनचे म्हणणे आहे की यावेळी जो कोणीही प्राइम मेंबर आहे, तो त्यांच्या मेंबरशीपची तारीख जाहीर होईपर्यंत चालू किमतीत त्यांची मेंबरशीप चालू ठेवू शकतो. पण, किंमतीत बदल झाल्यानंतर वापरकर्त्यांना नवीन किमतीत मेंबरशीप घ्यावी लागेल. ही दरवाढ लागू होण्याअगोदर युजर्सनी रिचार्ज केल्यास त्यांना सध्याच्या दरातच मेंबरशीप मिळणार आहे. प्राइम यूथ ऑफर किमतीत बदल झाल्यानंतरही लागू होईल. अद्याप या वाढीचे कारण अमेझॉनने स्पष्ट केलेले नाही. परंतु, देशातील प्राइम मेंबरशिपची मागणी जास्त असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याची शक्यता आहे. किंमती वाढल्यामुळे ॲमेझॉन आपली सेवा सुधारण्याचा विचार करू शकतो. याच वाढत्या लोकप्रियतेमुळे अनेक चित्रपटही ॲमेझॉनवर रिलीज झाले आहे.