तैवान प्रश्नावरून अमेरिका आणि चीन युद्धाच्या उंबरठ्यावर?


वॉशिंग्टन – चीन आणि तैवान यांच्यामधील संबंध गेल्या काही दिवसांपासून प्रचंड ताणले गेले आहेत. तैवान हा चीनचाच भाग असल्याचे दावे चीनकडून सातत्याने केले जात आहेत. तसेच, चर्चेतून मार्ग न निघाल्यास बळाचा वापर करून तैवानवर ताबा मिळवण्याचा निर्धार चीनी प्रशासनाकडून बोलून दाखवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर तैवानने देखील स्वसंरक्षणासाठी सज्ज असल्याचे जाहीर केलेले असताना या वादात आता जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेने उडी घेतली आहे. महासत्ता होण्यासाठीची अमेरिका आणि चीन यांच्यातील स्पर्धा सर्वश्रुत आहेच. पण, आता तैवान प्रकरणावरून हे दोन्ही देश प्रत्यक्ष युद्धमैदानात समोरासमोर उभे ठाकण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

तैवानकडून चीन आक्रमणासाठी सज्ज असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वीच देण्यात आला होता. तैवानच्या संसदेत बोलतानाच यासंदर्भात गंभीर शब्दांमध्ये तैवानचे संरक्षण मंत्री चियू कुओ चेंग यांनी चीनी आक्रमणाची भिती बोलून दाखवली होती. चीनसोबत गेल्या ४० वर्षांमध्ये सर्वाधिक तणावाचे वातावरण सध्या निर्माण झाले असून कोणत्याही क्षणी आक्रमण करण्यासाठी चीन सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले होते. तैवानने देखील त्या दृष्टीने तयारी सुरू केली असून स्वसंरक्षणासाठी तैवान तयार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, चीनकडून यानंतर देखील सातत्याने तैवानवर ताबा मिळवण्याच्या दृष्टीने सूचक वक्तव्य केली जात असताना या वादात आता अमेरिकेने उडी घेत थेट चीनलाच सज्जड दम भरला आहे. जर चीनकडून तैवानवर आक्रमण करण्यात आले किंवा तैवानचा ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आणि तैवानचे सार्वभौमत्व धोक्यात आले, तर अमेरिका तैवानच्या संरक्षणासाठी चीनविरोधात उभी ठाकेल. ती आमची बांधीलकी असल्याचे म्हणत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी चीनला इशारा दिला आहे.

व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्यांनी यासंदर्भात अधिक माहिती देताना तैवान रिलेशन्स अॅक्टची आठवण करून दिली. तैवानसोबत अमेरिकेचे असलेले लष्करी संबंध हे तैवान रिलेशन्स अॅक्टनुसारच कायम राहणार आहे. या करारानुसार आम्ही आमचे कर्तव्य निभावू, तैवानला त्यांच्या स्वसंरक्षणात आम्ही मदत करत राहू, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

चीनला अमेरिकेने इशारा दिलेला असताना अमेरिकेला चीनने देखील प्रत्युत्तर दिले आहे. चीन आणि अमेरिका यांच्यातील संबंध, शांतता आणि स्थैर्याला धक्का लावायचा नसल्यास अमेरिकेने तैवानला अशा प्रकारे कोणताही चुकीचा संदेश देऊ नये, असे अमेरिकेला चीनकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि चीन आता आमनेसामने उभे ठाकणार का, याची चर्चा आंतरराष्ट्रीय विषयांच्या जाणकारांमध्ये सुरू झाली आहे.