डॉ. मनमोहन सिंग सप्टेंबरमध्ये जाणार ओबामांच्या भेटीला

वॉशिंग्टन – भारत आणि अमेरिका या दोन्ही देशातील व्दिपक्षिय संबंध तसेच संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी 27 सप्टेंबरमध्ये भारताचे पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग हे अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांच्या भेटीला व्हाईट हाऊस येथे जाणार आहेत.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन यांनी आज (मंगळवारी) पंतप्रधानांच्या अमेरिका दौर्‍यासंबंधी अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार सुसान राईस आणि चक हेगल यांच्याशी भेट घेतली. या भेटीनंतर राष्ट्रीय सुरक्षा प्रवक्ते कॅटलिन हेडेन यांनी सांगितले, की या दोन्ही नेत्यांची भेट यापूर्वी पंतप्रधान मनमोहन सिंह यांच्या 2009 मध्ये झालेल्या वॉशिंग्टन दौर्‍यात तसेच राष्ट्रपती ओबामा यांच्या 2010 च्या भारत दौर्‍यात झाली होती.’

मनमोहन सिंह हे या दौर्‍यात ओबामा यांच्याशी व्यापार, गुंतवणूक आणि राष्ट्रीय सुरक्षा या विषयांवर व्दिपक्षीय चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या भेटी दरम्यान यांच्यामध्ये अंतर्गत सुरक्षेसमोरील आव्हाने, व्यापार आणि अफगाणिस्तान व न्यूक्लियर देवाणघेवाण या विषयांवर चर्चा होणार आहे.

ओबामा आणि मनमोहनसिंग यांच्यात चर्चा होणार असल्याचे यापूर्वीच जाहीर करण्यात आले होते. पण, तारीख निश्चित करण्यात आली नव्हती. आता ती निश्चित झाली असून, भारत-पाकिस्तानमधील वाढत्या तणावांकडे बघता या बैठकीकडे सर्वांचे लक्ष्य आहे. अमेरिकेत मनमोहनसिंग यांची पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्याशीही चर्चा होण्याची शक्यता आहे.