भारत आणि चीन यांच्यात चर्चा होत आहे आणि याच दिवशी भारताचे हर्क्युलस विमान चीनच्या हद्दीच्या अगदी लगत उतरवण्यात आले आहे. हे ऐकायला काही तरी वेगळे वाटते. कारण आजवर चीनच्या ड्रॅगनने ङ्गुत्कार टाकावेत आणि भारताच्या हत्तीने ते ऐकून घ्यावेत असे घडत आले होते पण आता वातावरण बदलत आहे. आपणही चीनला अरेला कारे करण्यास सज्ज होत आहोत. त्याची झलक या हर्क्युलसने दाखवून दिली आहे. चीनने आपल्या हद्दीत येऊन काही तरी गडबड करायची आणि आपण काहीच करायचे नाही. ही तर प्रथाच झाली होती. पाकिस्तानही आपल्या हद्दीत येऊन गोळीबार करून जातो त्यावर आपण निदान निषेध तरी करतो पण चीनने काही आगळीक केल्यावर आपण निषेधसुद्धा करीत नाही. माध्यमात आरडा ओरडा होतो तेव्हा आपले सरकार चीनने काहीही केलेेले नाही अशी सारवा सारव करते. पण आता चित्र बदलले आहे. भारताच्या उत्तर आणि पूर्व सीमेवर ज्या ठिकाणी चीनचे संभाव्य आक्रमण होऊ शकते त्या ठिकाणांवर आपले लष्कर जबरदस्त तयारी करीत आहे. या तयारीचे तपशील पाहिले असता आपल्याला अभिमान वाटल्या वाचून राहणार नाही.
त्या तयारीतून आलेल्या आपल्या आत्मविश्वासाचे प्रत्यंतर आपल्याला काल आले. चीन आणि भारत यांच्यात बीजिंंग मध्ये चर्चा सुरू असतानाच भारताने गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या तिबेटमधल्या दौलत बेग ओल्डी या ठाण्याच्या जवळ चिनी सीमेेपासून केवळ २० किलोमीटर अंतरावर आपल्या हवाई दलातले मालवाहू विमान उतरवले आहे. चीनने आक्रमण केले तर काही तासात आपले हजारे सैनिक अगदी देशाच्या कोणत्याही कोपर्यातून तिथे आणता येतात याचे दर्शन आपण चीनला घडवले. या विमानाने आपल्या आक्रमक शैलीचा पहिल्यांदाच अनुभव आला. त्याला कारणही तसेच झाले. प्रत्यक्ष ताबा रेषेच्या काही ङ्गूट अलीकडे पलीकडे काहीतरी गडबड करणे ही चीनची नेहमीचीच पध्दत आहे. पण गेल्या एप्रिल मध्ये भारतीय हद्दीत १०० किलोमीटर आत येऊन चीनने दौलत बेग ओल्डी या ठिकाणी तंबू ठोकले. तिथे आपण हे विमान उतरवले आहे. या चौकीच्या जवळच १९६२ साली चीनने काबीज केलेला अक्साई चीनचा प्रदेश आहे. म्हणून ही कुरापत अधिक चिंतेची ठरली होती. आपल्या देशातले राजकीय नेतृत्व दुबळे आहे, आपण चीनशी संघर्ष केला तर ते आपल्याला महागात पडेल, असे आपण मानत आलो आहोत पण आता या वातावरणातून बाहेर पडत आपण चीनच्या डोळ्याला डोळा भिडवत आहोत.
१९६२ साली चीनशी झालेल्या युद्घात आपला पराभव झाला होता. म्हणून आपण प्रत्येक वेळा चीनची दादागिरी सहनच केली पाहिजे असे तर काही म्हणता येत नाही. कधीतरी आपल्याला हिंमत दाखवून चीनलाही निर्णायक टोला लगवण्याची सिद्धता करावीच लागेल. सुदैवाने त्याची सुरूवात झालेली आहे. चीनने तिबेट गिळंकृत केला आणि तिबेटमध्ये विमानतळ, हेलीपॅड तसेच सडका तयार केल्या. कोणत्याही क्षणी हजारो चिनी सैनिक या परिसरात भारताच्या सीमेच्या बाजूने उभे करण्याची तयारी केली. आपण मात्र काहीच केले नाही. आपण चीनची तयारी बघत बसलो आणि चिंता करत बसलो. पण गेल्या १७ जुलैला सरकारने एक धाडसी निर्णय घेतला असून पूर्व तसेच ईशान्य सीमेवर चीनपेक्षाही भारी तयारी करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. या निर्णयाने भारताच्या संरक्षण सिद्धतेविषयीच्या धोरणात १८० अंशाचा बदल झाला आहे. या सिद्धतेवर ६४ हजार कोटी रुपये खर्चण्यास मान्यता देण्यात आली आहे. या भागात चीन प्रमाणेच आपलेही सैन्य वेगाने आणता येईल असे रस्ते तयार होत आहेत. भारताची लाल ङ्गित ङ्गेकून देऊन गेल्या तीन वर्षात या सार्या सीमा प्रदेशात हजारो किलो मीटर्सच्या चौैपदरी सडका तयार झाल्या आहेत.
दौलत बेग ओल्डी जवळच्या जगातल्या सर्वात उंच धावपट्टीवर भारताने विमान उतरवून चीनवर मानसिक दबाव आणला आहे. युद्ध झालेच तर चीनपेक्षाही वेगाने या परिसरात आपले सैन्य आणून उतरवता येईल हे आपण दाखवून दिले आहेे. भारत-चीन सीमेवर बर्ङ्गाळ प्रदेशात लढण्याची क्षमता असणारे विशेष लढाऊ दलही भारत सरकारने निर्माण केले आहे. या नव्या दलात ५० हजार लढाऊ सैनिक असतील. शिवाय खास आक्रमक दलात एक लाख २० हजार जवान भरती करण्यात येतील. भारताच्या संरक्षण सिध्दतेत केलेला हा पहिलाच एवढा मोठा विस्तार आहे. चीनने भारतावर आक्रमण केलेच तर भारताच्या ज्या सीमा पेटतील त्या पश्चिम, उत्तर आणि पूर्व या तिन्ही सीमांचे रक्षण करण्याची क्षमता या दलामध्ये निर्माण करण्यात आलेली आहे. भारताची क्षेपणास्त्रेही चीनच्या उरात धडकी भरवणारी आहेत. भारत हा शांततावादी देश आहे. म्हणून भारताशी सतत आगळीकच केली पाहिजे असे चीनला वाटत असेल तर तो त्याचा गैरसमज आहे. हे भारताने चीनला कधीतरी दाखवण्याची गरज होती.