भंडाफोड करणार्‍या स्नोडेनच्या डिस्क नष्ट

लंडन- अमेरिकेच्या हेरगिरीचा भंडाफोड करणा-या एडवर्ड स्नोडेनशी संबंधित गार्डियन’कडे असलेल्या डिस्कला नष्ट करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. ब्रिटन सरकारने ही कृती केली आहे. चिनी हेरगिरीच्या भीतीने हे कृत्य करण्यात आले असल्याची सबब अधिकार्‍यांनी दिली आहे.

ब्रिटिश सरकारच्या निगराणी संस्थेने (जीसीएचक्यू) स्नोडेन प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवले होते. जीसीएचक्यूच्या दोन अधिकार्‍यांनी स्नोडेनशी संबंधित डिस्कला नष्ट करण्याचे काम केले. गार्डियनच्या इतिहासातील ही अतिशय विचित्र घटना आहे, अशी नाराजीची प्रतिक्रिया वृत्तपत्रांकडून व्यक्त करण्यात आली.

वृत्तपत्राच्या लंडनमधील कार्यालयात जीसीएचक्यूचे सुरक्षा तज्ज्ञ दाखल झाले व त्यांनी हार्ड डिस्क नष्ट केल्या. चिनी हेरांच्या हाती ही माहिती लागू नये, या उद्देशाने सरकारने हे काम केल्याचे सांगण्यात येते.