“रामचरितमानस”चा मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात समावेश


भोपाळ – मध्य प्रदेशातील पदवीधर विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा तुळशीदासचे “रामचरितमानस” भाग असेल. तसेच रामसेतूबद्दल अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना शिकवले जाणार आहे. त्याचबरोबर हिंदीमध्ये मेडिकलच्या विद्यार्थ्यांना औषधांचा अभ्यास करण्याचा पर्याय दिला जाईल. हिंदी भाषेतही वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यासक्रम तयार केले जात आहेत, याची खात्री करण्यासाठी आम्ही लवकरात लवकर एक समिती स्थापन करणार आहोत. आम्ही लवकरच हिंदीमध्ये वैद्यकीय अभ्यास देखील सुरू करू, असे मध्य प्रदेशचे वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास सारंग यांनी सांगितले.

उच्च शिक्षणासाठी अभ्यासक्रम समितीच्या शिफारशीनुसार, २०२१-२२ च्या शैक्षणिक सत्रापासून प्रथम वर्षाच्या बीएच्या विद्यार्थ्यांसाठी रामचरितमानसचे तत्वज्ञान एक पर्यायी अभ्यासक्रम म्हणून सुरू करण्यात आले आहे. यामध्ये १०० गुणांची प्रश्नपत्रिका असेल आणि यामध्ये भारतीय संस्कृतीच्या मूळ स्त्रोतांमधील अध्यात्म आणि धर्म’, ‘वेद, उपनिषद आणि पुराणातील चार युग’, ‘रामायण आणि श्री रामचरितमानसमधील फरक’ आणि ‘दैवी अस्तित्वाचा अवतार’ या विषयांचा समावेश असेल.

सी राजगोपालचारी यांनी लिहिलेली महाभारताची प्रस्तावना इंग्रजीच्या फाउंडेशन कोर्समध्ये, प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना शिकवली जाईल. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या विविध परिमाणांवर लक्ष केंद्रित करून नेतृत्व क्षमता आणि मानवतावादी वृत्ती विकसित करण्यास मदत करणे याचे उद्दीष्ट आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. के.बी. हेडगेवार, भारतीय जनसंघाचे प्रमुख दीन दयाल उपाध्याय आणि डॉ. बी. आर. आंबेडकर यांचे चरित्र वैद्यकशास्त्रातील पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक आणि वैद्यकीय नैतिकता रुजवण्यासाठी समाविष्ट करण्याचा प्रस्ताव आहे.

याबाबत माहिती देताना मध्य प्रदेशचे उच्च शिक्षण मंत्री मोहन यादव म्हणाले, की आपला गौरवशाली इतिहास आपल्या पुढच्या पिढ्यांसमोर आणण्यासाठी हे बदल करण्यात येत आहेत. हा अभ्यासक्रम विद्वान लोकांच्या शिफारशीनुसार लागू केला जात आहे. नासाच्या अभ्यासाने हे सिद्ध केले आहे की राम सेतू हा लाखो वर्षांपूर्वी बांधलेला मानवनिर्मित पूल असल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान, शिक्षणाचे भाजपकडून भगवेकरण होत असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये धर्मनिरपेक्षतेला भाजप सरकारने प्राधान्य द्यायला हवे, असेही काँग्रेसने म्हटले आहे. मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे आमदार आरिफ मसूद म्हणाले, केवळ रामायण आणि महाभारताचा उल्लेख भाजप सरकारने केला आहे. पण, त्यांनी अभ्यासक्रमात कुराण, बायबल आणि गुरू ग्रंथ साहिबचा देखील समावेश करायला हवा. भारत हे धर्मनिरपेक्ष राष्ट्र असून ते सर्व धर्मांना जोडून ठेवते.