तर दोन तास तुमची खाकी वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा – संदीप देशपांडे


मुंबई – नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी वसईत परिवहन सेवेच्या उद्धाटनासाठी हजेरी लावली होती. मनसे कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमात गोंधळ घालत घोषणाबाजी केली. पोलिसांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांना कार्यक्रमातून बाहेर काढताना मारहाण केली. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी यावरुन संताप व्यक्त केला आहे. या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ शेअर करत पोलिसांना आव्हान दिले आहे. त्याचबरोबर मारहाण करणाऱ्या पोलिसांना निलंबित करण्याची मागणी केली आहे.

व्हिडिओच्या माध्यमातून संदीप देशपांडे यांनी म्हटले की, एकनाथ शिंदे यांच्या वसई-विरार येथील कार्यक्रमात आयुक्त साहेब वेळ द्या, असे म्हणत आंदोलन करणाऱ्या मनसे कार्यकर्त्यांवर पोलिसांनी हात उचलला. त्यांना आई-बहीणीवरुन पोलिस शिव्या देत होते. मला त्या पोलिसांना एकच सांगायचे आहे, आमच्या महाराष्ट्र सैनिकांच्या आई-बहीणी रस्त्यावर पडलेल्या नाहीत. सरकारचे दलाल असल्यासारखे काम करु नका. सत्ता येते, सत्ता जाते. पण पोलिसांनी पोलिसांसारखे काम केले पाहिजे. तसेच मनसे जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्यांच्या कानाखाली मारण्याचीही गरज नव्हती. एवढा माज दाखवू नका आणि एवढी सत्तेची दलाली करु नका. एवढेच असले तर दोन तास तुमची वर्दी बाजूला ठेवा आणि आमच्याशी भिडा. आणि मग तुम्हाला आम्ही दाखवतो, राज साहेबांचे कट्टर सैनिक काय आहेत.

तुमच्यावर जेव्हा हल्ला झाला तेव्हा आम्हीच तुमच्या संरक्षणासाठी आझाद मैदानावर मोर्चा काढला. पोलिसांवर हात उचलायचा नाही ही राज साहेबांची शिकवण असल्यामुळे आम्ही हे सहन करत आहोत. याचा अर्थ असा नाही की, आम्ही प्रत्येक गोष्ट सहन करु, असे म्हणत त्यांनी पोलिसांना त्यांच्यासाठी काढलेल्या मोर्च्याची देखील आठवण करुन दिली. संदीप देशपांडे यांनी यावेळी मनसे कार्यकर्त्यांवर हात उचलेल्या पोलिसांच्या निलंबनाची मागणी देखील केली आहे. त्याचबरोबर ज्या हातांनी महाराष्ट्र सैनिकांना मारले, त्याच हातांनी सलाम कराल, असेही त्यांनी म्हटले आहे.