8-17 जानेवारी दरम्यान UPSC परीक्षा तर फेब्रुवारीमध्ये MPSC परीक्षा होण्याची शक्यता


नवी दिल्ली – फेब्रुवारी महिन्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा (MPSC) तर 8 ते 17 जानेवारी दरम्यान केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा (UPSC) होणार असल्याची माहिती सामान्य प्रशासन विभागातील वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्याने राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एसईबीसी (SEBC) प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या किंवा केंद्र सरकारच्या ईडब्लूएसचा पर्याय निवडण्यासाठी 15 जानेवारीपर्यंत मूदत दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने 9 सप्टेंबर 2020 रोजी मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणास स्थगिती दिल्यामुळे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागस प्रवर्गाचा दावा केलेल्या विद्यार्थ्यांनी खुल्या किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक या प्रवर्गातून आरक्षण बदलावे, असे आदेश काढले आहेत. 15 जानेवारी पर्यंतची मूदत त्यासाठी विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे.

आयोगाच्या परीक्षा कोरोना व्हायरस संकटामुळे लांबणीवर पडल्यानंतर कोरोना नियमावलीचे पालन करुन परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. पण मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यामुळे परीक्षा पुन्हा रद्द करण्यात आल्या. पण विद्यार्थ्यांची होणारी मानसिक कोंडी, बेरोजगारी यामुळे आयोगाने परीक्षा घेण्यासाठी दिशेने पाऊले उचलायला सुरुवात केल्यानंतर लवकरच आता आयोगाच्या परीक्षा पार पडली अशी शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, मागील वर्षात अनेक परीक्षांचे कोरोना संकटामुळे घोळ झाले. यंदाच्या वर्षीही अद्याप संकट टळलेले नसल्याने परीक्षांच्या नियोजनला आतापासूनच सुरुवात झाली आहे. एप्रिलमध्ये बारावीच्या परीक्षा तर, मे महिन्यात दहावीच्या परीक्षा घेण्यावर राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. सामान्यपणे बारावीची परीक्षा फेब्रुवारी तर, दहावीच्या परीक्षा मार्च महिन्यात घेतली जाते. पण कोरोना संकटामुळे शाळा नियमित सुरु न होऊ शकल्यामुळे यंदाच्या वर्षी परीक्षा उशीरा घेतल्या जाणार आहेत.