नरेंद्र मोदी – मनमोहनसिंग भेट

नवी दिल्ली दि.६ – गुजराथचे मुख्यमंत्री आणि २०१४ च्या निवडणुकीत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून चर्चा असलेले नरेंद्र मोदी यांनी आज म्हणजे बुधवारी सकाळी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. पंतप्रधानांच्या भेटीमागचा उद्देश सांगण्यात आलेला नाही तसेच या भेटीवेळी काय चर्चा झाली याचाही तपशील मिळू शकलेला नाही.

मोदींच्या निकटवर्तीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजराथच्या निवडणूका सलग तिसर्यां ना जिकल्यानंतर मोदी यांनी पंतप्रधानांची घेतलेली भेट ही औपचारिकतेचा भाग आहे. मोदींच्या कार्यकाळात गुजराथचा झालेला विकास हा मोदींसाठी अभिमानाचा आहे आणि या संबंधीच या भेटीत काही चर्चा होण्याची अपेक्षा मोदी यांना होती असेही समजते. गुजराथमधील कांही प्रश्नांबाबतही मोदी पंतप्रधानांशी चर्चा करणार होते.

या भेटीनंतर मोदी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्समध्ये विद्यार्थी मेळाव्यात हजर राहिले. १२ फेब्रुवारीला ते अलाहाबादला कुंभमेळ्यासाठीही जाणार आहेत असेही सांगण्यात आले आहे.