ब्राझीलमध्ये अॅपलला गमवावा लागणार आयफोन ट्रेडमार्क

ब्राझील कॉपीराईट रेग्युलेशन प्रमाणे अॅपलला आपला लोकप्रिय आयफोन हा ट्रेडमार्क लॅटीन अेमरिकेतील वेगाने विकसित होत असलेल्या ब्राझीलच्या बाजारपेठेत तरी वापरता येणार नसल्याचे समजते. ब्राझीलमधील एका स्थानिक कंपनीने सात वर्षांपूर्वीच आयफोन हे नांव कॉपीराईट संस्थेकडे रजिस्टर केले होते व कायद्यानुसार त्यामुळे याच कंपनीला- ग्रॅडिएटर इलेक्ट्रोनिकाला वापरता येणार आहे. ही कंपनी कझ्युमर इलेक्ट्रोनिक उत्पादन कंपनी आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वरील कंपनीने आयफोन हे नांव त्यांच्या उत्पादनासाठी २००० सालीच रजिस्टर केले होते. त्यानंतर सात वर्षांनी अॅपलने या नावाने आपली लोकप्रिय स्मार्टफोन मालिका बाजारात आणली. ब्राझीलच्या बौद्धिक संपदा हक्कानुसार वरील कंपनीने प्रथम नोंदणी केली असल्याने त्यांनाच हे नांव ट्रेडमार्क म्हणून वापरता येणार आहे. अॅपलला हे नांव तेथे वापरता येणार नाही. या संबंधीची अधिकृत घोषणा १३ फेब्रुवारीला केली जाणार असून त्यांनतर अॅपल न्यायालयात दाद मागू शकेल असे समजते.

ब्राझील ही लॅटीन अमेरिकेतील स्मार्टफोन जगात वेगाने विकसित होत असलेली बाजारपेठ आहे त्यामुळे या बाजारपेठेत आपली उत्पादन आणण्यासाठी अॅपलसह सर्वच या क्षेत्रातील कंपन्या उत्सुक आहेत. ग्रॅडिएटर इलेक्ट्रोनिका कंपनीने आयफोन नावानेच त्यांचे स्मार्टफोन गेल्या डिसेंबरमध्ये बाजारात आणले आहेत.