जगद्विख्यात सतारवादक पं. रविशंकर यांचे निधन

सॅन दिएगो: जगद्विख्यात सतारवादक भारतरत्न पं. रविशंकर यांचे बुधवारी सकाळी येथे निधन झाले ते ९२ वर्षाचे होते. नागील काही दिवसापासून श्वसनाच्या विकाराने त्रस्त असलेल्या रविशंकर यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. शुक्रवारी त्यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली. त्यांच्या मागे पत्नी सुकन्या आणि संगीतकार कन्या अनुष्का, दुसरी कन्या नोरा जोन्स, तीन नातवंड, चार पणतवंड असा परिवार आहे.

सतार या अभिजात भारतीय वाड्याच्या शास्त्रीय वादनाचा जगभर प्रसार करणाऱ्या पंडितजींचा जन्म वाराणसी येथे ७ एप्रिल १९२० रो जी झाला. लहानपणापासून सतारवादनाची साधना करणाऱ्या रविशंकर यांनी वयाच्या केवळ १० व्या वर्षी सतरावादानाचा पहिला कार्यक्रम सादर केला. भारत आणि अमेरिका या दोन्ही देशात त्यांचे वास्तव्य होते. या दोन्ही ठिकाणी त्यांनी शेकडो शिष्य घडविले.

सन १९३० पासून त्यांनी जगभरात; विशेषत: केनडा, जर्मनी, इंग्लंड, फ्रान्स या ठिकाणच्या रसिकांना त्यांनी भारतीय अभिजात संगीताची मोहिनी घातली. तीन वेळा ग्रेमी पुरस्कार मिळविण्याबरोबरच त्यांना जगभरातील विविध पुरस्कार आणि मानसन्मानांनी सन्मानित करण्यात आले.

रविशंकर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या सह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.