आधार नंबरवर आधारित बँक प्रीपेड कार्ड

नवी दिल्ली दि.१२ – मोबाईलच्या प्रीपेड कार्डप्रमाणेच आता आधार नंबर वर आधारलेली बँकेची प्रीपेड कार्ड उपलब्ध होणार असून त्याची सुरवात प्रथम राजधानी दिल्लीतून करण्यात येत आहे. या योजनेचे उद्घाटन मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या हस्ते होणार असल्याचे समजते.

आज मोबाईलची प्र्रीपेड कार्ड जशी कोणत्याही आऊटलेट मधून रिचार्ज करून घेता येतात तशीच आता नागरिकांना बँकेची प्रीपेड कार्डही कोणत्याही आऊटलेटमधून चार्ज करून घेता येणार आहेत. मात्र त्यासाठी संबंधित ग्राहकाकडे त्याचा आधार कार्ड नंबर असणे आवश्यक आहे. रिझर्व्ह बँकेने सोमवारीच आधारकार्ड केवायसी साठी उपयुक्त असल्याचे व त्यावर निवास, वय, ओळख व बायोमेट्री ही आवश्यक माहिती अगोदरच असल्याचे निदर्शनास आणून दिल्यानंतर बँकांसाठीही प्रीपेड कार्डची योजना सुरू केली जात आहे.

देशातले पहिले प्रीपेड कार्ड सुरू करण्यात एसबीआय, आयसीआयसीआय, अॅक्सिस, एचडीएफसी, इंडियन ओव्हरसीज बँक यांनी उत्सुकता दाखविली असून या बँका त्यांची प्रीपेड कार्ड मिळावीत यासाठी १०० आऊटलेट सुरू करणार आहेत. सर्वसामान्य नागरिकांनाही आर्थिक प्रवाहात सामील करण्याच्या उद्देशाने सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे सांगण्यात येत आहे. या कार्डसाठी व्याज आकारले जाणार नाही. मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी बँक खाती उघडावीत हाही यामागचा हेतू आहे असे स्पष्ट करण्यात आले आहे

Leave a Comment