सॅन दिअॅगो दि.१२ – गेली सात दशके जगभरातील संगीत प्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजविणारे प्रख्यात सतारवादक पं.रविशंकर यांचे आज पहाटे अमेरिकेतील सॅन दिअॅगो येथे निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. येथील रूग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते तेथेच त्यांची प्राणज्योत मालविली.
संगीत क्षेत्रात अजोड कामगिरी बजावणारे पं.रविशंकर यांना १९९९ साली भारतरत्न या सर्वोच्च नागरी पुरस्काराने गौरविण्यात आले होते. वाराणसी येथे ७ एप्रिल १९२० रोजी जन्मलेल्या रविशंकर यांचे घराणे कलाकारांचेच घराणे आहे. प्रथम रविशंकर यांनी कांही काळ नृत्यसाधनाही केली होती. त्यानंतर मात्र ते संगीत क्षेत्राकडे वळले आणि सतारवादनात त्यांनी अलौकीक नैपुण्य प्राप्त केले. मात्र १९५६ सालापासून त्यांनी युरोपचे दौरे करायला सुरवात केली आणि तेव्हापासूनच त्यांना लोकप्रियतेची खरी चव चाखायला मिळाली.
पाश्चात्यांना भारतीय संगीताची ओळख करून देण्याचे मोठे कार्य रविशंकर यांनी केले असून जगभर भारतीय संगीत पोहोचविण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे. त्यांना तीन वेळा सन्मानाचा समजला जाणारा ग्रॅमी अॅवॉर्डही मिळाला आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी पं.रविशंकर यांच्या निधनाबद्दल दुःख व्यकत करतानाच रविशंकर हे भारतीय सांस्कृतिक परंपरेचे जागतिक राजदूत होते आणि देशाचा अनमोल खजिना होते अशा शब्दात श्रद्धांजली वाहिली आहे.