नवी दिल्ली: संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरळीत पार पडावे यासाठी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केलेला ‘डिनर डिप्लोमसी’चा बेत व्यर्थ ठरला असून अधिवेशनाच्या दुसर्या दिवशीही रिटेल क्षेत्रात थेट विदेशी गुंतवणुकीसह अनेक विषयांवर विरोधकांनी राज्यसभा आणि लोकसभेत गोंधळ घातला. दोन्ही सभागृहांचे कामकाज सोमवारपर्यंत तहकूब करण्यात आले आहे.
अधिवेशनाचा पहिला दिवसही थेट विदेशी गुंतवणुकीबाबत कोणत्या नियमांतर्गत चर्चा करावी या वादात वाया गेला होता. थेट विदेशी गुंतवणुक हा धोरणात्मक निर्णय असल्याने त्यावर चर्चा करू; मात्र मतदान घेणार नाही; या भूमिकेवर सत्ताधारी अजूनही ठाम आहेत; तर विरोधकांना या विषयावर मतदान हवे आहे. या शिवाय अनुसूचित जाती, जमातींना बढतीत आरक्षण, अनुदानित सिलेंडर्सची संख्या या मुद्द्यांवरून विरोधक सभागृह डोक्यावर घेत आहेत; तर उत्तरप्रदेशमधील समाजवादी पक्षाचे सरकार बरखास्त करावे या मागणीसाठी बहुजन समाजवादी पक्षाचे खासदार आक्रमक आहेत.
सर्वात मोठा विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाशी जुळवून घेत संसदेचे कामकाज सुरळीत चालावे यासाठी मनमोहन सिंग यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना गुरुवारी भोजनासाठी पाचारण केले होते. पण त्यांची ‘डिनर डिप्लोमसी’ व्यर्थच ठरली आहे.
यापूर्वीच्या संसद अधिवेशनात कोळसाकांडामुळे कामकाज ठप्प झाले होते.