शिंदे यांनी ओढवून घेतली सोनियांची नाराजी

नवी दिल्ली: क्रूरकर्मा दहशतवादी अजमल कसाब याच्या फाशीबाबत काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि पंतप्रधान मनमोहन सिंग हे देखील अनभिज्ञ होते; या केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वक्तव्यावरून त्यांनी सोनियांची नाराजी ओढवून घेतली असून त्याबाबत शिंदे यांना स्पष्ट कल्पनाही देण्यात आल्याचे वृत्त आहे.

मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यात जिवंत हाती लागलेला एकमेव अतिरेकी अजमल कसाब याला फाशी देण्याच्याचे ‘ऑपरेशन एक्स’ अत्यंत गुप्तेत पार पडल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती देताना शिंदे यांनी या ऑपरेशनबद्दल सोनिया गांधी अथवा पंतप्रधानांनाही माहिती नसल्याचे विधान केले होते. त्यांच्या या विधानाने मनमोहन सरकारच्या जमेच्या बाजूत मोलाची भर घालणार्या या कामगिरीतील गांभीर्य लोपले आणि शिंदे यांचे विधान हास्यास्पद ठरले; अशी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाची भावना असल्याचे शिंदे यांना सुनाविण्यात आले; अशी माहिती काँग्रेस सूत्रांनी दिली आहे.

एकीकडे काँग्रेस पक्ष संघटन आपले नेतृत्व कणखर आणि धडाडीचे असल्याचे जनतेच्या मनात ठसविण्याच्या प्रयत्नात असताना शिंदे यांचे विधान या प्रयत्नांना मारक ठरले आहे आणि दुसरीकडे सरकारचे सर्वोच्च नेते असलेल्या पंतप्रधानांना कासाबच्या फाशीसारख्या अत्यंत महत्वाच्या कारवाईबाबत माहिती नसणे हे तर्कदुष्ट आहे. त्यामुळे सरकार आणि पक्ष संघटना या दोन्ही पातळ्यांवरील रोषाला सामोरे जाण्याची वेळ शिंदे यांच्यावर आली आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे यांना जबाबदारीने बोलण्याची कडक सूचना पक्षनेतृत्वाकडून देण्यात आल्याचे समजते.

यापूर्वी देखील ‘लोक बोफोर्स प्रकरण जसे विसरले; तसे कोळसा कांडही विसरतील’; असे विधान शिंदे यांनी पुण्यात केले होते. त्याच्या दुसर्याच दिवशी ‘गंमत करणे अंगलट आले’; अशी सारवासारव करण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. मात्र आता गंमत नव्हे; तर गंभीरपणे केलेले विधानही शिंदे यांच्या चांगलेच अंगलट आले आहे.

Leave a Comment