राजकीय पक्षात रस नाही: बेदी

नवी दिल्ली: इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या कार्यकर्त्यांना पोलीस त्रास देत असल्याचा आरोप करून अरविंद केजरीवाल यांनी संसद मार्ग पोलीस ठाण्यासमोर निदर्शने केली. पोलिसांच्या छळाबाबत त्यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग याना पत्रही दिले. टीम अण्णाच्या दुसर्‍या ज्येष्ठ सदस्या किरण बेदी यांनी मात्र केजरीवाल घाई करीत असल्याचे प्रतिक्रिया दिली. नियोजित राजकीय पक्षात आपण असणार नाही; हे ही बेदी यांनी स्पष्ट केले.

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी इंडिया अगेन्स्ट करप्शनने पंतप्रधानांसह वरिष्ठ राजकीय नेत्यांच्या घराला घेराव घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते यांच्या झटापट झाली. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सोमवारी ४० कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात येण्यास सांगितले होते. त्यासाठी केजरीवाल यांच्यासह संसद मार्ग पोलीस ठाण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी पोलिसांविरोधात निदर्शने केली. केजरीवाल यांनी पोलिसांकडे आपल्याला अटक करा; असा आग्रह धरला. मात्र पोलिसांनी त्यांना अटक केली नाही.

बेदी यांना या आंदोलनात सहभागी करून घेण्यात आम्ही कमी पडलो; अशा शब्दात केजरीवाल यांनी बेदी यांच्या अनुपस्थितीबाबत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या पुढे आमच्या बरोबर असतील; अशी आशा त्यांनी व्यक्त केली. दुसरीकडे बेदी यांनी अप्रत्यक्षपणे केजरीवाल यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली. केजरीवाल करीत आहेत ते चूक नाही. मात्र ते घाई करीत आहेत; असे मत त्यांनी व्यक्त केले. आताच आंदोलन सोडून राजकीय पक्ष स्थापन करावा असे आपल्याला वाटत नाही. मी सध्या ज्या मार्गाने लोकपाल संमत करून घेता येईल; त्याकडे लक्ष केंद्रित केले आहे. राजकीय पक्षात मी सहभागी नाही; असे बेदी यांनी स्पष्ट केले.