दुष्काळावर मार्ग काढण्यासाठी ग्रामस्थांचे सहकार्य हवे: मुख्यमंत्री

मुंबई: राज्यातील दुष्काळावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी जलसंधारणाच्या कामामध्ये ग्रामपंचायती आणि ग्रामस्थ यांचा सहभाग अतिशय महत्वाचा असल्याचे मत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.

आदर्श गाव प्रकल्प समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन टंचाईसदृश परिस्थितीत करण्यासारख्या उपाययोजना आणि नियोजन याबाबत सादरीकरण केले.

यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की; सलग दुसर्‍या वर्षी राज्याला दुष्काळाला तोंड द्यावे लागत आहे. दरवर्षी पावसाचे प्रमाण घटत असून पावसाचे वेळापत्रक आणि प्रमाण अनियमित होत आहे. त्यामुळे पावसाचे पाणी शक्य तेवढे जमिनीत मुरविणे आणि उपलब्ध पाण्याचा नियोजनपूर्वक वापर करणे हाच यावरील उपाय आहे. समपातळी चर पद्धतीचा अवलंब राज्यात प्रायोगिक तत्वावर करण्यात येईल; अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली.

मृदसंधारण, जलसंधारण, पाणलोटाचा विकास, ठिबक सिंचन, विंधन विहिरींवर नियंत्रण, नाला बंडिंग, बंधारे या द्वारे पाण्याच्या उपलब्धतेत वाढ करणे शक्य असून त्यासाठी ग्रामस्थांचा सहभाग आवश्यक असल्याचे मत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले.

सर्व पाणलोट क्षेत्रात पर्जन्यमापक बसविल्यास उपलब्ध पावसाचा नेमका अंदाज घेऊन नियोजन करणे शक्य होईल; याकडे पवार यांनी मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले.

Leave a Comment