थायलंडमधील दोन रेस्टॉरंट मालकांना ७२३ वर्षांची शिक्षा; जाणून घ्या काय आहे प्रकरण


आजवर आपण सर्वसामान्यपणे जन्मठेप अथवा आजीवन जन्मठेपेची शिक्षा झाल्याचे ऐकले किंवा वाचले असेल, पण थायलंडमधील दोन हॉटेल व्यावसायिकांना तब्बल ७२३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ही शिक्षा त्यांना ग्राहकांची फसवणूक केल्याबद्दल सुनावण्यात आली आहे.

थायलंडमधील बँकॉक शहरात Laemgate Infinite नामक एक रेस्टॉरंट असून आपल्या रेस्टॉरंटचा धंदा वाढवा यासाठी या रेस्टॉरंटचे मालक Apichart Bowornbancharak आणि Prapassorn Bawornban यांनी एक स्किम लागू केली. दोन्ही मालकांनी सर्वात कमी किमतीमध्ये सी-फूड अशी स्किम आखत आपल्या ग्राहकांना व्हाऊचर्स वाटली. ग्राहकांना या व्हाऊचर्ससाठी आधी पैसे देणे बंधनकारक करण्यात आले. फेसबूक पेज व अन्य सोशल मीडियावरही या स्किमची जाहिरात दोन्ही मालकांनी केली. सर्व ग्राहकांकडून व्हाऊचरसाठी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे २१५ रुपये (८८ बाथ) घेतले.

ही व्हाऊचर्स बँकॉक शहरातील तब्बल २० हजार लोकांनी खरेदी केली. काही ग्राहकांना सुरुवातीला ठरल्याप्रमाणे सी-फूड मिळाले. पण त्यानंतर ग्राहकांना आपल्या सी-फूड साठी महिनो-महिने वाट पहावी लागत होती. रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांनी काही दिवसांनी आपली ऑफर रद्द करत आपल्याला मोठ्या प्रमाणात सी-फूड मिळत नसल्याचे सांगितले. त्याचबरोबर ग्राहकांचे ग्राहकांचे उरलेले पैसे देखील परत करण्याची तयारी या दोन्ही मालकांनी दाखवली. ठरल्याप्रमाणे तक्रार केलेल्या ८१८ ग्राहकांपैकी ३७५ ग्राहकांना त्यांचे पैसे परत देण्यात आले. पण ज्यांना पैसे मिळाले नाहीत, त्यांनी रेस्टॉरंटच्या दोन्ही मालकांविरोधात तक्रार दाखल केली.

रेस्टॉरंट मालकांच्या वकीलांनी न्यायालयात आपली बाजू मांडताना, ग्राहकांच्या ऑर्डर पूर्ण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मासळी मिळणे शक्य होत नसल्यामुळे ही स्किम बंद करण्यात आल्याचे सांगितले. अखेरीस दोन्ही मालकांना न्यायालयाने ग्राहकांची फसवूणक, खोटी जाहिरात केल्याप्रकरणी दोषी ठरवल्यानंतर त्यांना ७२३ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. त्याचबरोबर १८ लाख ७ हजार ५०० बाथचा दंड दोन्ही मालकांना ठोठावण्यात आला. शेकडो वर्ष कारावासाची आरोपींना शिक्षा सुनावण्याचा थायलंडमध्ये कायदा आहे. पण यानंतर आरोपीचे वर्तन सुधारल्यास त्यांची २० वर्षांनंतर सुटका करण्यात येते.

Leave a Comment