देशात समूह संसर्ग झाल्याचे सत्य सरकारने स्वीकारावे; तज्ज्ञांची केंद्राला सूचना


नवी दिल्ली – देशात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याचे सरकारी आकडेवारीतून स्पष्ट होत असल्यामुळे देशभरात सध्या समूह संसर्ग झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. पण या फक्त चर्चा असल्याचे म्हणत भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) समूह संसर्ग झाल्याचे वृत्त फेटाळून लावले होते. पण, आता देशातील काही तज्ज्ञांनी समूह संसर्ग झाल्याचा दावा केला आहे आणि हे सत्य सरकारच्या अडथळ्यामुळे स्वीकारले जात नाही. त्याचबरोबर आता केंद्र सरकारने देशात समूह संसर्ग झाल्याचे सत्य स्वीकारावे, जेणेकरून देशातील नागरिक गैरसमजामध्ये राहणार नाही, अशी सूचना सरकारला तज्ज्ञांनी केली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने देशाल लॉकडाऊन जाहिर केला होता. पण सध्या सुरु असलेल्या लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बऱ्याच प्रमाणात शिथिलता देत देश अनलॉक करण्यास सुरुवात झाली आहे. पण यामुळे देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असल्याचे दिसत असल्यामुळे समूह संसर्ग झाल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. पण, हा दावा आयसीएमआरने फेटाळून लावला होता. समूह संसर्गाचे वृत्त आयसीएमआरने फेटाळल्यानंतर देशातील तज्ज्ञ डॉक्टरांनी देशातील अनेक भागांमध्ये समूह संसर्ग झाल्याचा दावा केला आहे. यासंदर्भातील वृत्त पीटीआय या वृत्तसंस्थेने दिले आहे.

दरम्यान आयसीएमआरने केलेल्या निरीक्षणावर ‘एम्स’चे (ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस) माजी संचालक डॉ. एम.सी. मिश्रा यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशातील अनेक भागात समूह संसर्ग झालेला आहे, यात तीळमात्रही शंका नाही. देशातून लॉकडाउन शिथिल केल्यानंतर व लोकांची गर्दी बाहेर पडू लागल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या वेगाने वाढली आहे. त्याचबरोबर एकही रुग्ण ज्या भागात नव्हता, तिथेही आता कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून आले आहे. सध्याची परिस्थिती आयसीएमआरच्या पाहणीत दिसून आलेली नाही. समूह संसर्ग झाल्याचे सरकारने पुढे येऊन मान्य करण्याची वेळ आल्यामुळे देशातील नागरिक गैरसमजात राहणार नाही आणि अधिक काळजी घेतील, असे मिश्रा यांनी सांगितले.
त्याचबरोबर देशात समूह संसर्गाला खूप आधीच सुरूवात झाली आहे. आरोग्य यंत्रणा ही गोष्ट मान्य करत नाही, ही वेगळी बाब आहे. विशेष म्हणजे हे आयसीएमआरने स्वतः केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. कोरोनाबाधित निघालेल्या ४० टक्के रुग्णांची कोणतीही ट्रॅव्हलिंग हिस्ट्री नाही. त्याचबरोबर कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या ते संपर्कात आल्याचीही नोंद नाही. हा जर समूह संसर्ग नसेल, तर मग काय आहे?, असा सवाल विषाणूशास्त्रज्ञ शहीद जमील यांनी केला आहे.

समूह संसर्ग झाल्याचा दाव्याला दिल्लीतील सर गंगा राम रुग्णालयात कार्यरत असलेले डॉ. अरविंद कुमार यांनीही दुजोरा दिला. आयसीएमआरचे म्हणणे एकवेळ स्वीकारले, तरी दिल्ली, मुंबई, अहमदाबाद यासारख्या ठिकाणी समूह संसर्ग झालेला नाही. हे नाकारता येणार नाही. भारत विस्तीर्ण देश आहे. प्रत्येक राज्यात कोरोनाचा वेगळा अनुभव येत आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या वेळी प्रादुर्भाव होत असल्याचेही कुमार यांनी सांगितले.

Leave a Comment