कोरोनाच्या संकटात ‘या’ देशाने सुरु केल्या शाळा; विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण


नवी दिल्ली : जगभरातील अनेक देशांना कोरोनाने आपल्या विळख्यात घेतले आहे. पण यासर्वांमध्ये इस्रायल हा एक असा देश आहे, जिथे हा व्हायरस नियंत्रणात आहे. त्याचमुळे इस्त्राइल सरकारने मे महिन्याच्या शेवटच्या सप्ताहात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि या देशाला तोच निर्णय सर्वात महागात पडला आहे. देशातील शाळा सुरू होताच २६१ विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.

मार्च महिन्यात इस्त्राइलमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात संक्रमण झाले होते. इस्त्राइल सरकारने याच दरम्यान लॉकडाऊनचा निर्णय घेतला. इस्रायलमधील कोरोनाबाधितांचा आकडा ३० एप्रिल रोजी १५,९४६ एवढा होता. त्यापुढील पंधरा दिवसात हा आकडा अगदी ६०० रूग्णांवर पोहोचला. याच उत्साहाच्याभरात सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला.

यासंदर्भात एनपीआरने दिलेल्या माहितीनुसार कोरोनाची इस्त्रायलमधील एका शाळेतील २६१ विद्यार्थी आणि शिक्षकांना लागण झाली आहे. याबाबत इस्रायल शिक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यात २५० विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या देशात एकूण कोरोनाबाधितांचा आकडा हा १७,३७७ एवढा आहे.

कोरोनाबाधितांचा आकडा इस्त्राइलमध्ये अचानक वाढल्यामुळे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी शाळा अनिश्चित काळाकरता बंद ठेवल्या होत्या. त्याचबरोबर जोपर्यंत शाळेतील विद्यार्थी किंवा शिक्षकेतर कर्मचाऱ्यांपैकी एकजणही कोरोनाबाधित असेल तोपर्यंत शाळा सुरू करणार नाही. शाळेत कोरोनाची लागण झाल्यानंतर जवळपास ६८०० विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे.

इस्त्राइलमध्ये कोरोनामुळे आतापर्यंत २९१ लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधितांच्या यादीत जगभरात इस्त्राइलचा ४२ वा क्रमांक आहे. देशात आतापर्यंत १४,९३३ लोकांना कोरोनाची लागण झाली होती, पण त्यातील बहुतांश लोकांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे.

Leave a Comment