सोशल मीडियात अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मृत्यूची चर्चा; अधिकृत दुजोरा नाही


नवी दिल्ली : जगावर असलेल्या कोरोनाच्या विळख्यात अंडरवर्ल्ड कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम हा अडकल्यामुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. तत्पूर्वी कालच आम्ही दाऊद आणि त्याची बायको महजबीन हे दोघेही कोरोनाबाधित असल्याचे वृत्त दिले होते. त्याचबरोबर या दोघांनाही कराचीतील लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आल्याचे सांगितले जात होते. पण आता दाऊदचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या चर्चा सोशल मीडियावर रंगल्या आहेत. पण दाऊदचा भाऊ अनीसने या सगळ्या अफवा असल्याचे एका वृत्तसंस्थेला सांगितले आहे. पण या बातमीला अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

आज सकाळपासून सोशल मीडियात 1993च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटाचा मुख्य सुत्रधार आणि अंडरवर्ल्डचा डॉन कुख्यात दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यु झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. याच दरम्यान सध्या डी कंपनीची सुत्र संभाळणारा दाऊदचा भाऊ अनीसने आयएएनएस या वृत्तसंस्थेला अज्ञात स्थळावरून फोनकरुन दाऊद आणि त्याचे कुटुंबिय कुशल असल्याचे सांगितले आहे. त्याचबरोबर त्याच्या कुटुंबातील कोणालाही कोरोनाची लागण झालेली नाही. अनीस हा युएईमध्ये लक्झरी हॉटेल्स त्याचबरोबर पाकिस्तानात बांधकाम व वाहतुक क्षेत्रात कार्यरत आहे.

दरम्यान कराचीमधील अतिसुरक्षित मानल्या जाणाऱ्या भागात दाऊद आणि त्याचे कुटुंबीय राहतात. या भागात लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे. दाऊद आणि त्याच्या बायकोला कोरोना झाल्याच्या वृत्तानंतर त्याच्या गार्ड्स आणि इतर स्टाफला क्वारंटाइन करण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. पण याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. तसेच, पाकिस्तान सरकारकडूनही कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही आहे. यातच आज सोशल मीडियावर दाऊद इब्राहिमचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. या केवळ चर्चा असून यात कितपत सत्यता आहे, याचा पाठपुरावा केला जात आहे.

Leave a Comment