
जयपूर – लॉकडाउन नियमांचे उल्लंघन करत चिथावणीखोर भाषण दिल्याप्रकरणी राजस्थानमधील दोन भाजप आमदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामगंजमंडीचे भाजप आमदार मदन दिलावर यांच्याविरोधात कोटा येथील महावीर नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. तर जयपुरच्या मानसरोवर पोलीस स्टेशनमध्ये अन्य एका प्रकरणामुळे सांगानेरचे भाजप आमदार अशोक लाहोटी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मदन दिलावर यांना चिथावणीखोर भाषण करत लॉकडाउनचेचं उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस पाठवण्यात आली आहे.
चिथावणीखोर भाषण आणि लॉकडाउनचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोन भाजप आमदाराविरोधात गुन्हा दाखल
संजय यादव यांनी मदन दिलावर यांच्याविरोधात तक्रार दाखल केली असून त्यांच्यावर विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर भाषण करून कोरोना आजाराविषयी संभ्रम पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. ९ एप्रिल रोजीचा चिथावणीखोर वक्तव्याचा दिलावर यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. यामध्ये विशिष्ट समुदायाविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्य केले असून कोरोना रोगांविषयी गैरसमज पसरवल्याचे दिसत आहे. संजय यादव यांनी त्यांच्याविरुद्ध फिर्याद दिल्यामुळे त्यांच्याविरोधात आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथीचे रोग कायद्यान्वये शुक्रवारी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, हे प्रकरण गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपविण्यात आल्याचे पोलीस उपअधीक्षक (डीएसपी) अमृता दुहान यांनी सांगितले.
तर रामचंद्र देवेंद्रा यांनी अशोक लाहोटी यांच्याविरोधात फिर्याद दिली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून चिथावणीखोर वक्तव्य आणि भाषण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. अशोक लाहोटी यांच्या भाषणामुळे दोन समाजात तेढ निर्माण होऊ शकतो असे रामचंद्र देवेंद्रा यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे.
