राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात 328 नवीन रुग्णांची भर


मुंबई : राज्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यात काल दिवसभरात 328 नवीन रुग्णांची भर पडली आहे. यात सर्वाधिक मुंबईत 118 जण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत. तर त्याखालोखाल पुण्यात 78 जण कोरोनाबाधित सापडले आहेत. परिणामी राज्यातील आकडा 3648 वर पोहचला आहे. वरळी, धारावीनंतर आता वडाळ्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढली असून एफएन वॉर्डमध्ये आतापर्यंत 118 रुग्ण झाले आहेत. यातील सत्तरच्या आसपास रुग्ण हे वडाळा येथील झोपडपट्टीमध्ये आढळून आले आहेत. संगम नगर, हिंमत नगर, कोरबा मिठागर या परिसरातील हे रुग्ण आहेत. मुंबई, पुण्यातील वाढते रुग्ण सर्वांच्याच चिंतेचा विषय झाला आहे.

काल राज्यात 11 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. काल झालेल्या मृत्यूंपैकी मुंबई येथील 5 आणि पुणे येथील 4 तर 1 मृत्यू औरंगाबाद मनपा आणि 1 मृत्यू ठाणे मनपा येथील आहे. कालपर्यंत पाठिवण्यात आलेल्या 67,468 नमुन्यांपैकी 63,476 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. तर 3648 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यातील या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत. त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट योजना अंमलात आणण्यात येणार आहे. राज्यात सध्या 344 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून काल एकूण 5994 सर्वेक्षण पथकांनी काम केले आहे. त्यांनी 23 लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण केले आहे. कालपर्यंत 365 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात 82,299 लोक होम क्वॉरंटाईन असून 6999 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

Leave a Comment