
नवी दिल्ली – सध्याच्या खडतर काळात कोरोनाग्रस्तांची देखभाल करणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना हरयाणातील मनोहरलाल खट्टर यांच्या सरकारने दिलासा दिला आहे. सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांना परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत हरयाणा सरकार दुप्पट पगार देणार आहे. मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी ही घोषणा इंडियन मेडिकल असोसिएशनचे प्रमुख, राज्यातील काही प्रमुख डॉक्टर आणि इतर संबंधित कर्मचाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतल्यानंतर केली.
कोरोनाग्रस्तांच्या सेवेतील वैद्यकीय कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार देणार हरयाणा सरकार
खट्टर सरकारने याआधीही कोरोनाग्रस्त रुग्णांच्या सेवेत असलेल्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी ५० लाखांपासून १० लाखांपर्यंतच्या वैद्यकीय विमा सुरक्षेची घोषणा केली होती. डॉक्टर हे सध्याच्या खडतर परिस्थितीत देवासारखे आहेत आणि आपल्या जिवाची पर्वा न करता ते कोरोनाशी लढा देत आहेत. हा निर्णय यासाठीच सरकारने घेतल्याचे खट्टर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले. हरयाणात आतापर्यंत १५४ लोकांना कोरोनाग्रस्त सापडले असून दोघांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.
