दादरमधील ‘शुश्रुषा’ रुग्णालय होणार सील


मुंबई – मुंबईतील दादर परिसरामध्ये असलेल्या शुश्रुषा रुग्णालयातील दोन नर्सेसना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालय सील करण्याची तयारी सुरु झाली असून हॉस्पिटलमध्येच रुग्णालयातील इतर सर्व परिचारिकांना क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेने एकाही नव्या रुग्णाला दाखल करुन घेऊ नका आणि जे रुग्णालयात दाखल आहेत त्यांना पुढील ४८ तासात डिस्चार्ज द्या असे आदेश दिले आहेत.

हॉस्पिटलमध्ये ज्या नर्सेसना क्वारंटाइन करण्यात आले आहे, त्यांची देखील कोरोना टेस्ट केली जाणार असल्याचे मुंबई महानगरपालिकेने म्हटले आहे. तसेच त्यांना दुसऱ्या रुग्णालयात दाखल करायचे का? यासंबंधीचाही विचार सुरु असल्याचेही महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे.

मुंबईतील कोरोना बाधितांचा आकडा ७७५ च्या वर गेला असून कोरोनाग्रस्तांची मुंबईतील आकडा हा राज्यातील संख्येच्या तुलनेत निम्म्यापेक्षा जास्त असल्यामुळे मुंबईत लॉकडाउनचे नियम आणखी कठोर होणार असल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी गुरुवारीच स्पष्ट केले. त्यातच आज मुंबईतील दादर परिसरात असलेल्या शुश्रुषा रुग्णालयातील दोन नर्सेसना कोरोनाची लागण झाल्यामुळे रुग्णालयातील इतर नर्सेसना क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर रुग्णालय सील करण्याची तयारीही सुरु करण्यात आली आहे.

Leave a Comment