पंकजा मुंडेंकडून ‘ठाकरे सरकार’च्या कामाची स्तुती


मुंबई – जीवघेण्या कोरोना व्हायरसमुळे राज्यात उद्भवलेल्या भीषण परिस्थितीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार सामोरे जात आहे. कोरोनाचे रुग्ण राज्यात आढळल्यानंतर राज्य सरकारने त्वरित पावले उचलत महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने त्याची माहिती जनतेला देत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या कामाला लोकांकडून दाद मिळत आहे. तर दुसरीकडे ठाकरे यांच्या नेतृत्वावर भाजपकडून टीका केली जात असतानाच भाजप नेत्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी उद्धव ठाकरे यांच्या कामाची तोंडभरून स्तुती केली आहे. उद्धव ठाकरे नवीन पायंडा पाडतील, असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला आहे.

कोरोनाच्या संकटाने राज्यात डोके वर काढल्यानंतर राज्य सरकार युद्ध पातळी संसर्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारकडून गेल्या महिनाभरापासून प्रयत्न केले जात असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर त्याबद्दल सोशल मीडियासह राजकीय वर्तुळातून कौतुकाचा वर्षावही होत आहे. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या नेत्यांकडून टीका केली जात आहे. एवढेच काय तर भाजपने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांमध्ये समन्वय नसल्याचा आरोपही केला आहे. भाजपची सरकारविषयी अशी भूमिका असताना भाजपच्या राज्यातील प्रमुख नेत्यांपैकी एक असलेल्या पंकजा मुंडे यांनी ठाकरे यांच्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना कौतुक केले आहे. त्यांनी सरकारच्या सध्याच्या कामाविषयी एका मुलाखतीत बोलताना भाष्य केले.

पंकजा मुंडेंना उद्धव ठाकरे आणि सरकारच्या कामाविषयी विचारलेल्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या, मी त्यांना महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणून शुभेच्छा देते. उद्धव ठाकरे व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत असल्याचे मला दिसत आहे. मी टीका करणार नाही. तसे वाटले तर सूचना नक्की करेन. तितका अधिकार मला त्यांच्याविषयी वाटतो. मुख्यमंत्री कुणीही असले तरी त्यांच्यावर आपला अधिकार असतो. त्यामुळे मला वाटत आतापर्यंत एक चांगले काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांविषयी लोकांच्या मनात वेगळे व्यक्तिमत्व असते. म्हणजे ती व्यक्ती अमूक असावी. त्याने ठराविक कपडे परिधान करावेत. विशिष्ट पद्धतीचे व्यक्तिमत्व असावे. पण, या सगळ्यांपेक्षा ते वेगळे दिसत आहेत. त्यांचा पेहराव किंवा सोशल मीडियावर स्वतः अॅक्टिव्ह नाहीत. मुख्यमंत्री कार्यालय फक्त अॅक्टिव्ह आहे. हे थोडसे वेगळे दिसते, कारण सोशल मीडियावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री स्वतः फार अॅक्टिव्ह होते. स्वतः ते ट्विट करायचे. त्यांचा सोशल मीडिया फार स्ट्राँग होता. उद्धव ठाकरे यांचा कल वेगळ्या पद्धतीने दिसत असल्यामुळे नवीन असा पायंडा ते पाडू शकतात असे मला वाटते. आजच्या परिस्थिती माझ्या त्यांना पूर्ण शुभेच्छा असल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

Leave a Comment