आव्हाडांविरोधात अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी भाजपची तक्रार


पंढरपूर : गृहनिर्माण मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर ठाण्यातील एका तरुणाने मारहाणीचा आरोप केल्यानंतर त्यांच्या अडचणीत भर घालण्यासाठी भाजपने प्रयत्न सुरू केले आहेत. भाजपकडून जितेंद्र आव्हाड यांच्यावर अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची तक्रार करण्यात आली आहे.

3 एप्रिल रोजी विठ्ठल मंदिरात न जाता सोलापूरचे पालकमंत्री असणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांनी संत चोखामेळा यांचे दर्शन घेतले होते व त्यांचा जातिवाचक उल्लेख केला होता. पोलीस ठाण्यात भाजप माजी उपाध्यक्ष शिरीष कटेकर यांनी संत चोखामेळा यांचा जातीवाचक उल्लेख करून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला म्हणून अ‍ॅट्रोसिटी अंतर्गत पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार केली आहे. भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकारण पंढरपूरातील चैत्र एकादशी महापूजा प्रकरणानंतर रंगणार असे चित्र सध्या दिसत आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या संरक्षणासाठी असलेल्या सरकारी पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली म्हणून अभियंत्याला उचलून आणले आणि आव्हाड यांच्या बंगल्यावर आणून बेदम मारहाण केली. त्यावेळी आव्हाड हे उपस्थित होते आणि त्यांच्यादेखत ही मारहाण केली गेली, अशी तक्रार ठाण्यातील एका तरुणाने केली आहे. हा तरूण पेशाने इंजिनिअर असून तो संभाजी भिडे यांच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा कार्यकर्ता असल्याचे सांगितले जात आहे.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सोशल मीडियावर विरोधात पोस्ट टाकणाऱ्या एका तरुणाला मारहाण केल्याच्या आरोपानंतर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ज्या तरुणाने त्याला माझ्या देखत आणि माझ्या माणसांनी मारहाण केली अशी तक्रार केली, मी त्याला ओळखत नाही. गेली 3 वर्षे हा अभियंता माझ्या विरोधात नाही नाही त्या पोस्ट करतोय हे माझे कार्यकर्ते मला अनेकदा सांगायचे पण मी त्याकडे दुर्लक्ष केले. मी सतत 24 तास माझ्या मतदार संघात आणि सोलापूर जिल्हयात कामात व्यस्त आहे. अभियंत्याला मारहाण हा प्रकार मला मीडिया मार्फत कळाला असा खुलासाही त्यांनी केला.

Leave a Comment