
मुंबई : मुंबईतील सुप्रसिद्ध जसलोक हॉस्पिटलमधील 12 कर्मचाऱ्यांनी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यात 4 ते 5 नर्स, एक स्वयंपाकी, इतर तंत्रज्ञ आणि मदतनीस यांचा समावेश आहे. संपूर्ण हॉस्पिटल सध्या सील करण्यात आले आहे. हे हॉस्पिटल आता क्वारंटाईन झोन बनले आहे. आतापर्यत रुग्णांसह कर्मचारी अशा 300 जणांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांचा अहवाल येणे बाकी आहे.
जसलोक हॉस्पिटलमधील 5 नर्ससह 12 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह
दुसरीकडे, जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला एक कोरोनाग्रस्त तरुण पूर्णपणे बरा झाला होता. त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. अमेरिकेत सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करणारा हा करुण 6 मार्चला अमेरिकेतून पॅरिसमार्गे मुंबईत आला होता. मुंबईत आल्यानंतर त्याला सर्दी, खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्यानंतर त्याला तातडीने कस्तूरबा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तिथे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्यातर त्याला मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.
31 मार्चला तो पूर्णपणे ठीक झाल्यानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला. या तरुणाची पत्नी आणि मुलगी देखील पॉझिटिव्ह आढळून आली होती. तेही पूर्णपणे बरे झाले आहेत. पण, त्याच्या संपर्कात आल्याने हॉस्पिटलमधील दोन परिचारिकांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. आता तर 5 नर्ससह 12 कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने हाहाकर उडाला आहे.
दरम्यान, आज राज्यात कोरोनाच्या 120 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कोरोनाग्रस्तांची संख्या 868 झाली आहे. आतापर्यत 70 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. काल दिवसभरात राज्यात 7 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. हे सगळे रुग्ण मुंबई आणि परिसरात दाखल होते. यामुळे राज्यात आतापर्यंत कोरोनाबळींची संख्या 52 झाली आहे.
