
प्रेक्षकांनी १९९४ मध्ये आलेल्या ‘द लायन किंग’ चित्रपटाला अक्षरशः डोक्यावर घेतले होते. हाच चित्रपट आता नव्या रुपात पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. अनेक बॉलिवूड कलाकारांनी ‘द लायन किंग’च्या हिंदी चित्रपटातील भूमिकांना आवाज दिले आहेत. बॉलिवूडचा किंग खान शाहरूखचाही यामध्ये समावेश आहे.
नुकताच शाहरूखच्या आवाजातील या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. शाहरूखने मुफासा या पात्राला चित्रपटात आवाज दिला आहे. या व्हिडिओमधील त्याच्या आवाजाच्या चाहतेही नक्कीच प्रेमात पडतील. शाहरूखच्या दमदार आवाजाची जादू शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये अनुभवायला मिळते.
किंग खानच्या आवाजसह रिलीज झाला ‘लायन किंग’चा हिंदी ट्रेलर
विशेष म्हणजे शाहरूखचा मुलगा आर्यन खान याने या चित्रपटातील सिंबा या मुख्य पात्राला आवाज दिला आहे. आता या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनची चाहत्यांनाही उत्सुकता आहे. १९ जुलै २०१९ ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित केला जाणार आहे.
